आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digital Revolution: Seven Redio Centre Will Be Digital

डिजिटल क्रांती: राज्यातील सात रेडिओ केंद्रे होणार डिजिटल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - टीव्ही आणि चित्रपटांच्या डिजिटल क्रांतीनंतर आता रेडिओमध्येही डिजिटल क्रांती होत आहे. ऑल इंडिया रेडिओने जून 2014 पर्यंत देशातील 58 रेडिओ केंद्रे डीआरएम (डिजिटल रेडिओ माँडिएल) करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्रातील सात केंद्रांचा समावेश आहे. या डिजिटल तंत्रज्ञानामुळे रेडिओ प्रसारणातील सध्याचे एसडब्ल्यू, एमडब्ल्यू, एफएम या तिन्ही प्रकारचे प्रसारण मोडीत निघणार आहे.


माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. काळाबरोबर बदल केला नाही तर अंत निश्चित, असे समीकरणच बनले आहे. काळाची हीच पावले ओळखून ऑल इंडिया रेडिओने काही वर्षांपूर्वी कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून आलेले ‘एफएम’ रेडिओचे तंत्रज्ञान स्वीकारले. ‘एफएम’मुळे रेडिओला पुन्हा चांगले दिवस आले. आता त्याहीपुढे जाऊन डीआरएम हे डिजिटल तंत्रज्ञान ऑल इंडिया रेडिओने स्वीकारले आहे.


चार वर्षांत सर्वच केंद्रांमध्ये बदल
० देशातील राजकोट व खामपूर या केंद्रांमध्ये डीआरएम तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.
० येत्या नऊ महिन्यांत आणखी 58 रेडिओ केंद्रांमध्ये हे तंत्रज्ञान बसवण्यात येणार आहे.
० महाराष्ट्रातील जळगाव, मुंबईची तीन, पुणे, रत्नागिरी, नागपूर या केंद्रांचा समावेश.
० 2017 च्या अखेरपर्यंत देशातील सर्व रेडिओ केंद्रांचे डीआरएममध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट.


काय आहे डीआरएम रेडिओ?
सध्या रेडिओचे प्रसारण एमडब्ल्यू, एसडब्ल्यू आणि एफएम या ध्वनिलहरींद्वारे केले जाते. हवेच्या प्रदूषणामुळे अलीकडे एसडब्ल्यू आणि एमडब्ल्यू केंद्रांचे प्रसारण त्यांच्या ठरलेल्या कव्हरेज एरियातही सुस्पष्ट ऐकायला येत नाही. ‘एफएम’लाही मर्यादा आहेत. डीआरएम तंत्रज्ञान वरील तिन्ही प्रकारच्या लहरी डिजिटल लहरींमध्ये रूपांतरित करते. या तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे एकदा रेडिओवर स्थानिक केंद्राची फ्रिक्वेन्सी सेट केली आणि तुम्ही देश-विदेशात गेलात तरी या रेडिओवर स्थानिक कार्यक्रम ऐकायला मिळतील.


डीआरएमची वैशिष्ट्ये
०खरखरमुक्त, सुस्पष्ट आवाज
०एकाच फ्रिक्वेन्सीद्वारे प्रसारण
० एकाच चॅनलमधून एकाच वेळी 4 सेवा प्रसारणाची क्षमता
० दूरवर विनाअडथळा सिग्नल पोहोचण्याची क्षमता
०मल्टिमीडिया अ‍ॅप्लिकेशन्स


पुढे काय? नवा रेडिओ घ्यावा लागणार
डीआरएम रेडिओवरून प्रसारण ऐकण्यासाठी मात्र सध्या तुमच्याकडे असणारा रेडिओ संच चालणार नाही. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा रेडिओ सेट विकत घ्यावा लागेल. भारतात अद्याप व्यापक स्वरूपात डीआरएम रेडिओ सेट उपलब्ध नाहीत. मात्र जसजसे केंद्रांचे ‘डीआरएम’मध्ये रूपांतर होईल, तसतसे रेडिओ संचही उपलब्ध होतील, अशी माहिती रेडिओ क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.


रेडिओवर ‘टेक्स्ट न्यूज’ही मिळणे शक्य
‘डीआरएम तंत्रज्ञानामुळे श्रोत्यांना सुस्पष्ट आवाजात कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. शिवाय टेक्स्ट मेसेज, टेक्स्ट स्वरूपातील बातम्याही वाचायला मिळतील. सध्या डीआरएम रेडिओ संचांची भारतातील किंमत सुमारे 7 हजार आहे. मात्र, मागणी वाढल्यावर 5 हजारांपर्यंत कमी होऊ शकते.’
अशोक सूर्यवंशी, केंद्रप्रमुख, सांगली आकाशवाणी केंद्र