सांगली - आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो म्हणून मोदींनी शिवसेनेविरोधात बोलणार नाही, असे स्पष्ट केले. म्हणून तुम्ही ‘मातोश्री’च्या मर्यादांचे उल्लंघन करू नका. बेताल वक्तव्ये थांबवा, असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी दिला.
सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मिरज आणि माधवनगर येथे स्वराज यांच्या सभा झाल्या. ‘‘लोकसभा निवडणुकीत भाजपने २७२ चे उद्दिष्ट ठेवले होते, ते सहज पूर्ण केले. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६० हून अधिक जागांचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे आणि ते सहज पार करू, असा मला विश्वास आहे. शिवाय मित्रपक्षांना मिळणा-या जागा वेगळ्या असतील. केंद्र आणि राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पिछाडीवर पडला. सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले आहे.
मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांचा शेती विकासदर ३० टक्क्यांच्या वर होता तर महाराष्ट्राचा विकासदर उणेमध्ये होता. महाराष्ट्राचे नेते म्हणवणारे शरद पवार कृषिमंत्री असताना ही स्थिती होती. तर महाराष्ट्राच्या विकासाचे असेच स्वप्न घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहेत. ते पूर्ण करण्यासाठी भाजपला एकहाती सत्ता द्या,’’ असे आवाहन स्वराज यांनी केले. मोदींनी शिवसेनेवर टीका करणार नाही, असे स्पष्ट करूनही उद्धव ठाकरे यांचे भाजपवरील टीकासत्र थांबलेले नाही, याबाबत स्वराज म्हणाल्या, ‘‘मोदींच्या स्पष्टीकरणानंतर उद्धव ठाकरे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी आशा होती. पण त्यांनी आमच्या सभांना अफजलखानांची उपमा दिली. शिवसेना हा आमचा २५ वर्षांचा मित्र आहे. बाळासाहेबांचा आम्ही आजही आदर करतो. ‘मातोश्री’ शी आमचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. एखाद्या निवडणुकीतील प्रचारांतून हे संबंध बिघडू नयेत, यासाठी उद्धव यांनी मातोश्रीच्या मर्यादांचे पालन करावे, असा सल्ला सुषमा स्वराज यांनी दिला.
उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?
भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे ‘मातोश्री’शी सलोख्याचे संबंध.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याच्या वेळी उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम स्वराज यांचेच नाव पुढे केले होते. मात्र, युती तुटल्यानंतर त्यांनीही टीकेची झोड उठवल्यामुळे आता उद्धव त्यांना काय प्रत्त्युत्तर देतात, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.