आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलगुरु डॉ. शिंदेंचे पेटंट "बामू'च्या नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डाॅ. देवानंद शिंदे यांनी मिळालेल्या तीन पेटंटपैकी पहिले पेटंट हे आपल्या मातृसंस्थेच्या म्हणजेच आैरंगाबादेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावे केले आहे. शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या न होऊ देण्यासाठीच्या औषधाचे पेटंट त्यांना मिळाले होते. त्यातून त्यांना तहहयात भरघोस कमाई मिळाली असती. मात्र ज्या मातृसंस्थेमुळे आपण घडलो तिच्याविषयी कृतज्ञता ठेवण्याच्या भावनेतून त्यांनी आपले पहिले पेटंट ‘बामू’ या विद्यापीठाच्या नावे नोंदवले आहे.

मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेले डाॅ. शिंदे यांना पहिली नोकरी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मिळाली. अतिशय कष्टातून त्यांनी तिथे आपले स्वतंत्र स्थानही निर्माण केले. त्यामुळे ही मातृसंस्था त्यांच्या दृष्टिने एक आदराचे स्थान बनली आहे. शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या न होऊ देण्यासाठी वॅरफॅरिन नावाच्या औषध त्यांनी तयार केले व पेटंटसाठी अर्ज केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत याची नोंदणी झाली होती.

यानंतर आंतरराष्ट्रीय मानकानुसार हे औषध निकषांमध्ये उतरल्यानंतर या विभागाकडून शिंदे यांच्याकडे कुणाच्या नावे पेटंट करायचे याबाबत विचारणा करण्यात आली. या वेळी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी याचे पेटंट ‘बामू’ विद्यापीठाच्या नावे करावे, अशी विनंती केली. आपल्या संभाव्य घसघशीत कमाईवर पाणी सोडून पुन्हा पुन्हा विचारणा केल्यानंतरही शिंदे यांनी हे पेटंट ‘बामू’ विद्यापीठाच्या नावावर करून आपल्या मातृसंस्थेवरील प्रेमाला कर्तव्यपूर्तीची जोड दिली. त्यांच्या या कृतीचे दाेन्ही विद्यापीठांतून काैतुक हाेत आहे.

मातृ देवाे भव:
डाॅ. शिंदे हे आपल्या जीवनात जन्मदात्या आईप्रमाणेच मातृसंस्थेलाही किती महत्त्व देतात याची प्रचिती या निमित्ताने आली आहे. काबाडकष्ट करून आपल्याला वाढविणार्‍या आईचे आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे त्यांनी नुकतेच दाखवून दिले हाेते. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारताना डाॅ. शिंदे यांनी आपल्या आधी आपल्या आईला विद्यापीठात पाय ठेवायला लावला हाेता व त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मग शिंदे यांनी विद्यापीठात प्रवेश केला हाेता. तसेच पदभार स्वीकारतानाही आपल्या खुर्चीच्या बाजूलाच आईलाही स्वतंत्र खुर्चीवर आसनस्थ हाेण्याचा मानही त्यांनी दिला हाेता. आता मातृसंस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
बातम्या आणखी आहेत...