आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरास्नी पाणी बगाय मिळतंय का न्हाय, कुणास ठावं?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- ‘‘गावाच्या दोन बगलतनं दोन कॅनाल गेल्याती पर उपेग काय? एकालाबी पाणी न्हाय. टेंभूच्या पाण्याची वाट बघत-बघत एक पिढी गेली. आमच्या पोरास्नीतरी पाणी बगाय मिळतंय का न्हाय, कुणास ठावं?’’, सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी गावाची ही स्थिती सांगत होते, रामचंद्र लेंगरे.

लेंगरेवाडी, आटपाडी तालुक्यातील साधारणत: 1000 लोकवस्तीचे गाव. व्यंकटेश माडगुळकर यांनी याच गावावर ‘बनगरवाडी’ ही कादंबरी लिहिली. माडगुळकर हे 1940 च्या दशकात या गावात शिक्षक होते. त्यांनी बनगरवाडी लिहिली त्या घटनेला आता 70-72 वर्षे उलटली. आज हे गाव कसे असेल, लोकांना पाण्यासाठी, जगण्यासाठी आजही गाव सोडावा लागत असेल का, हे प्रश्न माझ्या मनात फेर धरून नाचत होते.

जेमतेम दोनशे कुटुंबांचं गाव. गावाच्या वेशीतच रस्त्याकडेला पाण्याच्या टाक्या, घागरी, घरातील असेल ते भांडे ठेवलेले... टँकर आला की पाणी भरायला सारे तुटून पडतात. एके ठिकाणी मेंढ्यांसाठी वाघर बांधण्याचे काम सुरू होते. दोघे वयस्कर माणसं भेटली आणि कोठून आला, कशासाठी आला, असं विचारलं. आम्ही ओळख सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘जनावरांचे फार हाल चाल्लेत. मेंढरं सार्‍या माळानं फिरत्यात पर पाऊसच न्हाय, तर काय खात्याल?’’
पाण्याचं काय, विचारल्यावर रामचंद्र लेंगरे सांगू लागले, ‘‘माणसांचबी तेच हाल. टँकर येतो दोन-चार दिवसातनं. कसं भागायचं? खर्चायला कुठूनतरी कोस-दोन कोसावरनं विहिरीचं पाणी आणावं लागतं. ते पण तोंडात घेण्यासारखं नसतं. त्या टँकरवाल्या बिचार्‍यानं तर काय करावं? सार्‍या तालुक्यातच दुष्काळ हाय; पर एवढं वाईट दिवस कधी बघीतलं नव्हतं बघा.

हा संवाद सुरू असताना दुसरे एक आजोबा सांगू लागले, ‘‘गावाच्या दोन्ही बगलतनं दोन कॅनाल गेल्यात. एक हाय राजेवाडी तलावाचा आन् दुसरा टेंभू योजनेचा. वीस वर्षं झाली ऐकतोय, आज पाणी येणार, उद्या येणार. पर अजून पाण्याचा पत्ता नाय. निम्मा गाव आधीच उठलाय. तिकडं कराड, वाळव्याला नदीकाठाला लोकं गेल्याती. महिनाभरानं इथं रिकाम्या वाघरा आन् भटकी कुत्रीच दिसत्याल.’’ गावात चुकून एखादा नोकरदार भेटेल. जगण्याच्या लढाईत हरलेल्या लोकांनी जमिनी विकून शहरे गाठली आहेत, ‘‘गावातील प्रत्येकाकडे अजूनही मेंढरं आहेत. शिवाय आठवी-दहावीपर्यंत शिकलेली पोरं सांगली, कराडला फळं विकायला जातात. त्यांच्यावर घर चालतं.’’ लेंगरेवाडी हे एकूणच आटपाडी तालुक्यातील दुष्काळाची भीषणता सांगणारे एक गाव.

विकासाच्या काही खुणा लेंगरेवाडीतही दिसत होत्या; पण जगायच्या साधनांचं काय? डांबरी रस्ते झाले, त्यावरून धूर सोडत जाणार्‍या गाड्या आल्या, शाळेत पोरं कॉम्प्युटर शिकायला लागली. घरात टीव्ही आला, त्यावर अमेरिका-युरोपची प्रगती दाखवणारे चॅनेल आले; पण या गावात आलं नाही ते जगायला बळ देणारं पाणी !!

हंगामी स्थलांतर नेहमीचेच
लेंगरेवाडीला स्थलांतर नवीन नाही. 50 वर्षांपूर्वी लोक पाऊस पडला नाही की कृष्णा नदीकाठी तात्पुरते स्थलांतर करायचे. नंतर परिस्थिती काहीशी बदलली. माथाडी कामगार म्हणून गेलेल्या लोकांनी मुंबईतच संसार थाटला. काही जण फळांच्या व्यापाराच्या निमित्ताने सांगलीत स्थायिक झाले. 15-20 वर्षांत कारखाने सुरू झाल्यावर ऊसतोडणी कामगार म्हणून लोकांनी स्थलांतर सुरू केले. मार्च महिन्यात हंगाम संपल्यावर गावाकडे दुष्काळी स्थिती असेल तर लोक तिथेच नदीकाठावर मिळेल ते काम करत राहतात. पाऊस पडला तर गावाकडे परततात.

1315 कोटी टेंभूवर खर्च
युती शासनाच्या काळात सुरू झालेल्या टेंभू योजनेवर 1315.52 कोटी रूपये खर्च झाले. खानापूर तालुक्यातील 45, आटपाडीतील 48, सांगोल्यातील 32, तासगावच्या 30, कडेगावच्या 35, कवठे महांकाळ 21 आणि कराड तालुक्यातील 6 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.