आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Nationalist Congress Cooperative In Bad ;patil ,kadam Blame

राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच सहकाराची दुर्दशा ; हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सहकारी बँका, कारखाने, संस्था बुडीत काढणा-या ना राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी घालते. त्यामुळेच सहकाराची दुर्दशा झाल्याची अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी केली. राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना निमूटपणे ही टीका सहन करावी लागली.

सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील सोमवारी सांगलीत एका व्यासपीठावर आले होते. या वेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सांगली जिल्हा बँक आणि बाजार समितीवर प्रशासक नेमणुकीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पतंगरावांनीच हे घडवून आणले, याकडे त्यांच्या रोख होता.

संस्था बरखास्ती अयोग्यच
‘मी लोकशाहीवर विश्वास ठेवतो. दोन-चार रुपये इकडेतिकडे झाले म्हणून संस्थाच बरखास्त करणे मला रुचत नाही. दोन-चार लोक दोषी असतील तर त्यांची चौकशी करा, कारवाई करा; मात्र त्यासाठी संस्थाच बरखास्त करणे योग्य नाही,’ असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कर्जवाटप केवळ राजकारणासाठी : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनीही पतंगराव कदम यांच्या सुरात सूर मिसळला. ते म्हणाले की, ‘केवळ निवडणुका आणि राजकारणासाठी जिल्हा बँका आणि राज्य बँकेने कर्जवाटप केले. शिस्त पाळली नाही तर बँका धोक्यात येतात हे राज्य बँकेवर प्रशासक नेमण्याच्या कार्यवाहीवरून सिद्ध होते. राज्य बँकेवर प्रशासक आणण्यात कोणतेही राजकारण नव्हते. आता प्रशासकांनी स्थिती सुधारल्याने बँकेला बॅँकिंग परवाना मिळाला आहे.’
चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालू नका : पतंगराव
पाटील यांच्या वक्तव्यावर पतंगराव म्हणाले की, ‘सहकारी बँका, साखर कारखाने राजकारणाचे अड्डे बनले आहेत. चुकीच्या गोष्टींना तुम्ही पाठीशी घालता. दोन पक्षांचे सरकार आहे म्हणून चाललेय. असले धंदे आता बंद करा. सहकारी संस्था गुणवत्तेवरच चालल्या पाहिजेत यासाठी आग्रही राहा.’
प्रशासकांनी बँकेला शिस्त लावली : हर्षवर्धन पाटील
‘प्रशासकांनी जिल्हा बँकेच्या कारभारात आमूलाग्र बदल केले आहेत. त्यांनी कारभाराला शिस्त लावली आहे. बँक अडचणीतून बाहेर काढून 20 कोटी रुपये नफ्यात आणली आहे. आता निवडून येणा-या संचालक मंडळाने प्रशासकांनी दाखवलेल्या मार्गाने जावे,’ असा सल्ला हर्षवर्धन पाटील यांनी दिला.