आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Not Wake Up Rationality In People, Sarsanghchalak Bhagwat Remark

विवेक जागवणारे शिक्षण मिळत नाही, सरसंघचालक भागवत यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - बाजारीकरणामुळे आज विवेक जागवणारे शिक्षण मिळत नाही. जगातील विकसित देश आपल्याकडे शिक्षणाची बाजारपेठ म्हणून बघतात. या परिस्थितीत आपली शैक्षणिक मूल्ये जपून माणसातील माणूसपण टिकवणारे शिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयाची गरज असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘माणसाला विचार आहे, त्याच्या जीवनाला काहीतरी लक्ष आहे. माणूस आपल्या करणीने नराचा नराधमही बनू शकतो आणि नराचा नारायणही बनू शकतो. म्हणून त्याला शिक्षणाची गरज आहे.
तीन हजार वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या शिक्षण पद्धतीतून विवेक जागवण्याचे काम केले जायचे. दुर्दैवाने आज या परंपरेचा व्यापार झाला आहे. किमतीच्या तराजूत शिक्षण तोलले जातेय.’’
‘‘परवा मी एक इंग्रजी लेख वाचला. ‘फ्युचर मार्केटस्’ या शीर्षकाखालील या लेखात व्यापाराला यापुढे कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या देशांत संधी आहेत, यावर या लेखात चर्चा करण्यात आली आहे, तर जगातील विकसित देश आपल्याकडे बाजारपेठ म्हणून पाहतात. यामध्ये शिक्षण हे क्षेत्र वरच्या क्रमांकावर आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात भारतात 3 ट्रिलियन डॉलर्सची बाजारपेठ असल्याचे त्यांचे भाकीत आहे. आपण शिक्षणातून संस्कार हद्दपार केल्याने ही बाजारपेठ जगाला खुली झाली आहे. मात्र अजूनही आपण बदल करू शकतो. संस्था चालवणारे, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातून चांगले शिक्षण आजही शक्य आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे.’’