आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या अधिवेशनामध्ये नाथाभाऊंच्या चौफेर फटकेबाजीने रंगत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या चौफेर टोलेबाजीने सभामंडपामध्ये रंगत आणली.
कधी प्रश्न विचारून, कधी टोमणा मारून तर कधी आकडेवारी देत त्यांनी सात महिन्यांतील सरकारच्या कारभाराचे समर्थन करतानाच मी शेतकर्‍यांना मोबाइलच्या बिलाबाबत विचारले त्यात काय चुकीचे केले, असा सवाल उपस्थित पदाधिकार्‍यांना केला. फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि रावसाहेब दानवेंच्या देखत खडसेंनी आपल्या विभागाच्या अनेक निर्णयांची प्रभावी पद्धतीने माहिती दिली.

आम्हाला सत्तेवर येऊन सात महिने होत नाहीत तोपर्यंत हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप होत आहे. हा आरोपच मला सहन होत नाही. शेतकर्‍यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून त्याचे सारे कर्ज मार्फ केले, विमा कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे अर्थसाहाय्य केले, आॅनलाइन पद्धतीने पैसे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवले हे सारं करूनही आमचं सरकार शेतकरीविरोधी कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मी म्हणालो की, शेतकरी जसं मोबाइलचं बिल भरतो तसं त्यांनी वीजबिलही भरलं पाहिजे. यात मी काय चुकीचं बोललो. पण या टीव्हीवाल्यांचा देवेंद्र जेवढा आवडता नाही, तेवढा मी आहे. नाथाभाऊ मोबाइल, नाथाभाऊ मोबाइल यांचं सुरू झालं. आता तुम्ही सर्वांनी सांगा की मी काय चुकीचं बोललो होतो.

कुणाच्या नशिबात काय,कुणास ठाऊक
सरकारम्हणजे कोण आहे. आम्ही कुणी वेगळे नाही. असं सांगतानाच खडसे म्हणाले की, कधीही बदल होऊ शकतात. आता अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. कुणाच्या नशिबात काय आहे कुणास ठाऊक अशी गुगली फडणवीसांकडे पाहत नाथाभाऊंनी टाकली आणि सभामंडप हास्यकल्लोळात बुडाला.

कर्जमाफी झाली तरी आत्महत्या थांबल्या का?
शेतकर्‍यांच्याआत्महत्या थांबाव्यात म्हणून संपूर्ण कर्जमाफी झाली. आत्महत्या थांबल्या का, आम्ही वीजबिल माफ केलं आत्महत्या थांबल्या का, सावकाराच्या वसुलीचा तगादा नको म्हणून तेदेखील कर्ज सरकारनं भरण्याचा निर्णय घेतला तरी आत्महत्या थांबल्या नाहीत. मला कुणीही अभ्यास करून सांगू दे की असं केलं तर आत्महत्या थांबतील तर सरकारची सगळी तिजोरी खाली करू आणि त्या उपाययोजना आम्ही करू, असे या वेळी खडसे यांनी सांगितले.