आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर पैशाचा ओघ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर/चंद्रपूर - निवडणुकीच्या तोंडावर राज्यभरात पैशाचा ओघ सुरू झाला आहे. पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत कोल्हापुरात 27 लाख, चंद्रपुरात साडेदहा लाख तर अमरावतीत पाच लाख रुपये जप्त केले. हवालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राज्यभरात विशेष पथके तैनात केले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज येथून कोल्हापूरला येणार्‍या वॅगनआर कारमधून (एमएच 04 सी 9138) कर्नाटक पोलिसांनी 27 लाख रुपये जप्त केले. बुगटे आलूर येथे पोलिसांनी ही कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत ही रक्कम युनियन बँकेची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रकमेचा निवडणुकीशी संबंध आहे का? याचा पोलिस रात्री उशिरापर्यंत तपास करत होते.
चंद्रपुरात पोलिसांनी बल्लारशहा टी पॉइंटजवळ एका कारमधून (एमएच 34-एए-5316) 10 लाख 50 हजार रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. कारचालक सुरेश राजपालसिंग बैलस (रा. चंद्रपूर) यासह दोघांना ताब्यात घेतले. प्रकरण आयकर खात्याकडे वर्ग केले आहे.

अमरावतीत पाच लाख
हिंगोलीहून अमरावतीला कार घेऊन जाणार्‍या दोघांकडून बडनेरा पोलिसांनी पाच लाखांची रोकड जप्त केली. या दोघांची चौकशी सुरू आहे. बडनेराहून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या स्कार्पिओ (एमएच 38 5771) मधून पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना कळवले आहे.