आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर - शिक्षणाच्या जोरावर परदेशात जाऊन बक्कळ पैसा कमावणा-यांची संख्या मोठी आहे, परंतु मिळवलेल्या पैशातील काही भाग समाजासाठी योगदान म्हणून देणा-यांची संख्या कमी दिसते. अमेरिकेत स्थायिक असलेल्या डॉ. अनंत लाभसेटवार आणि डॉ. लता लाभसेटवार यांनी मात्र 1 कोटी रुपयांचे प्रतिष्ठान स्थापन करून गेल्या 13 वर्षांपासून भारतीय गुणवंतांचा गौरव करण्याचे काम केले आहे.
मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील असलेले लाभसेटवार यांची परिस्थिती गरिबीची. लहानपणापासूनच हुशार असलेले लाभसेटवार बी.एस्सी.ला नागपूर विद्यापीठात पहिले आले. त्यांना पुढच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. वडिलांनी 4000 रुपये उसने घेऊन मुलाला बोटीने अमेरिकेला पाठवले.. तिथे ते एम.एस्सी.मध्ये गुणवत्ता यादीत आले. शिकत असताना त्यांनी हॉटेलात ग्लास विसळण्याचे काम करून वडिलांना पैसे पाठवले. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पीएच.डी. मिळवल्यानंतर त्यांना अमेरिकन सरकारने संशोधन क्षेत्रातील नोकरीची आॅफर दिली. परंतु ती नाकारून पेटंटच्या माध्यमातून डॉ. लाभसेटवार यांनी कोट्यवधी रुपये मिळवले. मोठी संपत्ती जमा केली व एक दिवस ती सर्व त्यांनी विकूनही टाकली.
यानंतर डॉ. अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास नागपूर आणि लाभसेटवार प्रतिष्ठान अमेरिका या दोन संस्थांची स्थापना केली. या माध्यमातून ते प्रतिवर्षी भारतामध्ये कार्यक्रम घेत असतात. त्यांना ललित साहित्यात रुची असून त्यांची आजवर दहा पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दरवर्षी 1 लाख रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. वाढती लोकसंख्या ही भारताच्या प्रगतीला अडसर ठरते, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे संतती नियमन या क्षेत्रात काम करणा-या ंनाही दरवर्षी 1 लाखाचा पुरस्कार देऊन ते गौरवतात. तसेच त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे राज्यांतील विविध विद्यापीठांत दरवर्षी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.
बँक विकत घेणारा पहिला भारतीय: पेटंटच्या बळावर संपत्ती मिळवताना डॉ. लाभसेटवार यांनी तेथील एक बँकच विकत घेतली. असे ते पहिले भारतीय ठरले. 1000 एकर शेती, एक रेडिओ स्टेशन, मॉल्सची साखळी त्यांनी निर्माण केली. प्रचंड व्यवसाय केल्यानंतर एके दिवशी हे सर्व त्यांनी विकूनही टाकले.
लताताईंचे योगदान : डॉ. लाभसेटवार यांच्या सर्व उपक्रमांत त्यांना मनापासून साथ देणा-या डॉ. लता लाभसेटवार या मूळच्या सोलापूरच्या.लता बुचवार हे त्यांचे माहेरकडील नाव. हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये त्यांचे शिक्षण झाले. नंतर त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम सुरू केले.
जन्मभूमी व देशासाठीचे कर्तव्य
ज्या महाराष्ट्रात जन्मलो तेथे काहीतरी करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून मी साहित्य पुरस्कार योजना सुरू केली, तर लोकसंख्यावाढीचा वेग कमी करणे हे भारतापुढचे आव्हान असल्याने या क्षेत्रात काम करणा-या ंना प्रोत्साहन देण्यासाठी दुसरा पुरस्कार सुरू केल्याचे डॉ. लाभसेटवार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.