आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: राजू शेट्टींची घाेषणा; कर्जमुक्तीसाठी ‘स्वाभिमानी’ची पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणरणत्या उन्हातून पायी मुंबईच्या दिशेने कूच करणार असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. - Divya Marathi
रणरणत्या उन्हातून पायी मुंबईच्या दिशेने कूच करणार असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
काेल्हापूर -शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, असा आत्मविश्वास त्यांच्यात जागवण्यात शेतकरी नेता म्हणून मीही कुठेतरी कमी पडलो याचा आत्मक्लेश म्हणून येत्या २२ मेपासून पुणे ते मुंबई पदयात्रा काढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी कोल्हापुरात केली. सातबारा कोरा करण्याची मागणी करणारे साडेसहा लाख अर्ज राज्यातल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे दिले आहेत. हे अर्ज मुंबईत राज्यपालांना देऊन ३० मे रोजी पदयात्रेची मुंबईत सांगता करणार असल्याचे ते म्हणाले.
 
‘कर्जमुक्तीच्या मागणीची खिल्ली उडवणारे काही जण आहेत. शेतकऱ्यांचे फार लाड चालू असल्याचे मानणाराही एक वर्ग आहे. अशा तथाकथित विद्वानांनी माझ्या पदयात्रेत एक दिवस येऊऩ शेतकऱ्यांची दुःखे समजून घ्यावीत,’ असे अावाहन शेट्टी यांनी केले.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी भाजप सरकारविराेधात काेल्हापुरात महामाेर्चा काढण्यात अाला. यानंतर वारणा-कोडोली गावात सभा घेण्यात अाली. संघटनेचे नेते व फडणवीस सरकारमधील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, राजस्थान किसान महापंचायतचे अध्यक्ष रामपाल जाट आदी यात सहभागी झाले हाेते. माेर्चाला व त्यानंतर झालेल्या सभेला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तसेच संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी माेठी गर्दी केली होती.

‘गोपीनाथ मुंडे यांनी माझी व नरेंद्र मोदी यांची अहमदाबादेत भेट घडवून आणली होती. त्या वेळी मोदींनी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यावर मोदींनी देशातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली. ज्या शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेवर बसवले तेच शेतकरी त्यांना सत्तेवरून हुसकावून लावू शकतात याची जाण त्यांनी ठेवावी,’ असे शेट्टी म्हणाले. कर्जमाफीसोबतच साखर कारखानदारांनी पाचशे रुपयांचा दुसरा हप्ता पावसाळ्यापूर्वी द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. अन्यथा २२ मेनंतर कारखान्यातून कणभरसुद्धा साखर विक्रीसाठी बाहेर येऊ दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 
दरम्यान, पुणे ते मुंबई पदयात्रेनंतरही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर आंदोलनाचा पुढचा टप्पा तीव्र असेल. या टप्प्यात मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला पुरवठा तोडला जाईल. पाणीपुरवठाही रोखला जाईल. या आंदोलनाची वेळ सरकारने आणू नये. शेतकऱ्यांची डोकी फिरली तर राज्यकर्त्यांना फिरणे मुश्कील होईल, असे शेट्टी म्हणाले.

‘काँग्रेस-राष्ट्रवादी’वर टीका
विराेधकांच्या संघर्ष यात्रेवर ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने सत्तेत असताना नेहमीच शेतकऱ्यांना मारण्याची भूमिका घेतली. त्यांचे शेतकरी प्रेम बेगडी आहे. कर्जमाफीची मागणी करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही, असा सर्व वक्त्यांचा सूर होता. उलट दोन्ही काँग्रेसच्या भ्रष्टाचारी नेत्यांना सरकारने गजाआड करावे म्हणजे शेतकऱ्यांचे दुःख कमी होईल, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

सरकारच्या भूमिकेला विराेध, पाठिंबा कायम
शेतकरी हिताचे निर्णय न घेणाऱ्या भाजप सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. स्वाभिमानी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरातील गुरुवारच्या विराट सभेत खासदार राजू शेट्टी याबाबत राजकीय घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शेट्टी यांनी गुरुवारी यासंदर्भात मौन पाळणे पसंत केले.

सभेच्या गावातच अात्महत्या
‘स्वाभिमानी’ची सभा हाेत असलेल्या वारणा-काेडाेली गावातील शेतकऱ्याने गुरुवारी आत्महत्या केली. पाच हजार रुपयांचा हप्ता थकल्याने बँकेच्या खासगी वसूलदाराने या शेतकऱ्याकडे तगादा लावला होता. त्याच्या मुलीलाही त्रास द्यायला सुरुवात केली. याला वैतागून शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. या घटनेचा उल्लेख करून शेट्टी म्हणाले, “शेतकरी नेता म्हणून मला अंतर्मुख करायला लावणारी ही घटना आहे. ज्या गावात सभा घेतली त्याच गावातला शेतकरी आत्महत्या करतो याचा अर्थ त्या शेतकऱ्याला आत्मविश्वास देण्यात मी कमी पडलो. त्या शेतकऱ्याला झालेल्या वेदना, व्यथांचा आत्मक्लेश म्हणून मी पुणे-मुंबई पदयात्रा काढणार आहे.’

‘वर्षा’चा प्रस्ताव शेट्टींनी नाकारला
येत्या २२ मे रोजी पुण्यातील भिडे वाडा येथील महात्मा फुले स्मारकास आदरांजली वाहून राजू शेट्टी मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू करणार आहेत. ऊस दरप्रश्नी काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना लक्ष्य करण्यासाठी शेट्टी यांनी ‘पंढरपूर ते बारामती’ यात्रा काढली होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड येथेही आंदोलन करण्यात आले होते. त्याच पद्धतीने आताही राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर पदयात्रा घेऊन जावी, असा काही कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र त्यास शेट्टी यांनी मान्यता दिली नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा राजू शेट्टी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...