आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • File Against Wildlife Department In High Court For The Sundar Elephant

सुंदर हत्तीच्या दुरवस्थेबद्दल वन्यजीव विभागाविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - वारणा उद्योग समूहाच्या वतीने जोतिबा देवस्थानला दिलेल्या सुंदर हत्तीची दुरवस्था होत असल्याचा आरोप करत पीपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (पेटा) संस्थेने उच्च न्यायालयात महाराष्‍ट्र वन्यजीवन विभागाच्या विरोधात दावा दाखल केला आहे. त्यामुळे जोतिबा देवस्थानचा हा हत्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जोतिबा देवस्थानावर श्रध्दा असणारे माजी मंत्री व विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील वारणा उद्योग समुहाने सुंदर नावाचे हत्तीचे पिल्लू देवस्थानला देणगी म्हणून दिले होते.
देवस्थानवर सहा वर्षे सुंदर वास्तव्याला होता. परंतू त्याची देखभाल नीट होत नसल्याने त्याची चिडचिड वाढली होती. यात्रेदरम्यान त्याने आकांडतांडवही केले होते. याबद्दल सांगली येथील अ‍ॅनिमल राहत संस्थेकडे अनेक तक्रारी झाल्या होत्या. याबाबत पेटा संस्थेने आवाज उठवला. ज्या पध्दतीने हत्तीची देखभाल होण्याची गरज आहे तशी ती होत नसल्याचे पेटाने स्पष्ट केल्यानंतर याबाबतच्या अर्जावर जगभरातील 26200 नागरिकांनी सुंदरच्या मुक्ततेसाठी मते नोंदवली. याची दखल घेत महाराष्‍ट्र वन्यजीव मंडळाने या हत्तीला बेंगलोर येथील पुनर्वसन केंद्रात पाठवावे असा आदेश दिला.
जून 2012 दरम्यान दरम्यान विनय कोरे यांनी आम्ही या हत्तीची देखभाल करण्यास समर्थ असल्याचे सांगते हा हत्ती वारणानगर येथे आणण्याचा निर्णय घेतला. या वेळी एक शासन, पश्चिम महाराष्‍ट्र देवस्थान समितीचे अधिकारी आणि राहतचे प्रतिनिधी यांची बैठकही झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेनुसार हत्तीला नेहमी फिरवून आणणे, औषधोपचार, नीट देखभाल करण्याचे ठरवण्यात आले होते. परंतू याबाबत पेटा संस्थेने गुप्तपणे वारणानगर येथील पोल्ट्री शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सुंदर हत्तीच्या परिस्थितीची पाहणी केली. छायाचित्रेही घेतली. काँक्रिटवर कायमपणे उभे राहिल्याने त्याच्या पायाला जखमा झाल्याचे पेटाच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांनी ऑगस्ट 2012 मध्ये सुंदरला मुक्त करण्याचे आदेश देऊनही माजी चीफ कंझरव्हेटर ऑफ फॉरेस्ट आणि सध्याचे फॉरेस्ट फोर्सचे प्रमुख एस. डब्ल्यू. नक्वी यांनी या आदेशाचे पालन केले नाही असाही आरोप करण्यात आला आहे. म्हणूनच या संस्थेने आता वनखात्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
विनय कोरेंशी संपर्क नाही
याप्रकरणी आमदार विनय कोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दूध संघाच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याशीसंपर्क होऊ शकला नाही. तर जनसुराज्यचे पक्ष प्रवक्ते विजयसिंह जाधव यांचा मोबाईल स्वीच ऑफ लागला.
पामेला अँडरसननेही घेतली सुंदरची दखल
पेटाने सुंदरच्या मुक्ततेसाठीची मोहीम हाती घेतल्यानंतर जगभरातून हजारो पशूप्रेमींनी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवली. प्रख्यात अभिनेत्री पामेला अँडरसन यांनीही याची दखल घेत संबंधितांशी पत्रव्यव्हार केला होता.