आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस कार्यकर्त्यावर कोल्हापूरमध्ये गोळीबार, गृहराज्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कॉँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक व माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील (48) यांच्यावर अज्ञात मारेक-यांनी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या सांगण्यावरूनच हा खून करण्यात आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील समर्थकांनी केली. अशोक पाटील हे बुधवारी शहरातील खरी कॉर्नरशेजारील अ‍ॅक्सिस बँकेच्या दारात गाडीजवळ उभे होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. यातील तीन गोळ्या डोक्यात आणि मानेत घुसल्याने पाटील खाली कोसळले. त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही बातमी कळताच महाडिक समर्थकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सुमारे 700 ते 800 जण तेथे आल्याने तणाव निर्माण झाला होता.

पाच पोलिस पथके रवाना
पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला पकडण्यासाठी पाच पथके तातडीने रवाना केली. हा खून राजकीय वादातून झाला की पूर्ववैमनस्यातून याचा शोध पोलिस घेत आहेत.

मृतदेह घेण्यास नकार
गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि महाडिक या कॉँग्रेस नेत्यांच्या अंतर्गत वादातून पाटील यांचा खून झाल्याचा आरोप करत शेकडो कार्यकर्त्यांनी रात्री सीपीआर चौकात ठिय्या दिला. सतेज पाटलांवर गुन्हा नोंदवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनीही रात्री घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

सरपंचपदाच्या वादातून हाणामारी, दगडफेक
कोल्हापूरपासून जवळच असलेल्या पाचगाव ग्रामपंचायतीची निवडणूक तीन महिन्यांपूर्वी झाली. यात कॉँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक गटाचा पराभव केला. सतेज पाटील यांच्या गटाचे वर्चस्व असतानाही सरपंचपदासाठी मात्र महाडिक गटाची महिला सदस्या पात्र ठरली. याहीपुढे जाऊन सतेज पाटील यांनी आपल्या गटाच्या महिलेचा ऐनवेळी दाखला आणून तिला सरपंच केले, त्यामुळे प्रचंड हाणामारी व दगडफेक झाली होती.