आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Elect, Then Critised On Us ; Ajit Pawar Said To Congress Leaders

आधी निवडून या, मगच आमच्यावर टीका करा; अजितदादांचा कॉंग्रेसी नेत्यांना सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - ‘आम्ही जनतेतून निवडून येतो, म्हणून जनतेचे प्रश्न, दु:खे आम्हाला समजतात. तुम्ही आधी जनतेतून निवडून येऊन दाखवा, मगच आमच्यावर टीका करा,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा समाचार घेतला. सांगली महापालिका निवडणुकीत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता.

या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत गेल्या दोन दिवसांत कॉँग्रेस नेत्यांनी राष्‍ट्रवादीवर सडकून टीका केली होती. त्याचा समाचार घेतानाच पवार यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावरही टीका केली. पवार म्हणाले, ‘महापालिकेच्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत. पण इथे केवळ एकमेकांवर टीका आणि उणीदुणी काढण्याचेच काम सुरू आहे. माणिकराव आले, जयंतरावांवर बोलून गेले. नारायण राणे आले, आबांना शिव्या देऊन गेले. अरे, आम्ही जनतेतून निवडून येतो. लाखालाखाचे मताधिक्य घेऊन पाच-पाचदा निवडून येतो. तुम्ही एकदा तरी निवडून या. आमचा प्रदेशाध्यक्षही जनतेतून निवडून येतो. माणिकराव, तुम्ही लोकांतून निवडून येऊ शकत नाही, कशाला गप्पा मारता. लोकांतून निवडून यायचं येरागबाळ्याचं काम नाही.’

काँग्रेसने राणेंना जागा दाखवली
नारायण राणे यांनी आर.आर.पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा अजित पवार यांनी समाचार घेतला. राणे यांचे नाव न घेता पवार म्हणाले, ‘शिवसेनेत मुख्यमंत्री म्हणून राहिलेले हे नेते काँग्रेसमध्ये आले. इकडेही मुख्यमंत्रिपद मिळेल असे त्यांना वाटले. पण त्यांना काँग्रेसनेच जागा दाखवली. आता ते आबांवर टीका करत आहेत; पण एकेकाळी त्यांचीही टोळी होती.’

आठवड्याला मांडी कापू का?
आर.आर.पाटील म्हणाले, ‘गुन्हेगाराशेजारी बसलो तर मांडी कापून देईन, असे मी म्हटलो होतो, हे मला मान्य आहे. पण राणेसाहेब, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर बुधवारी तुम्ही माझ्या शेजारी बसता. मग मला आठवड्याला मांडी कापून द्यावी लागेल.’

मुंडेसाहेब, तुमचा पुतण्या ऐकत नाही !
मुंडेंबाबत पवार म्हणाले की, ‘परळी पंचायत समितीची पोटनिवडणूक आम्ही जिंकली. मग यांनी ओरड सुरू केली, अजित पवारांनी आमचं घर फोडलं. अरे, आम्ही काय घरफोड्या आहोत? तुम्हाला तुमचं घर सांभाळता येत नाही, त्याला आम्ही काय करणार? शरद पवारांचा पुतण्या नुसत्या नजरेवर काम करतो. तुमचा पुतण्या तुमचे ऐकतच नाही. धनंजयला तिथे त्रास होता म्हणूनच तो राजीनामा देऊन राष्ट्रवादीत आला.’

पतंगरावांनाच पद नाही, ते काय दुस-याला देणार ?
पवार म्हणाले, कोणी किती जमिनी लाटल्या, हे आम्हालाही माहीत आहे. आम्ही टीका करायला लागलो तर तुमचीही अंडीपिल्ली बाहेर काढू. पतंगराव कदम सांगताहेत, ‘आम्ही सांगलीला आणखी एक मोठं पद आणलंय.’ अहो, पतंगराव, तुम्हाला हवं ते पद मिळत नाही. दुस-याला काय पदे वाटता?’

अजित पवारांच्या बेताल वक्तव्याच्या चौकशीचे आदेश
अजित पवार यांनी इंदापूरच्या सभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. धुमकेकर यांनी शुक्रवारी पोलिसांना दिले. ऐन दुष्काळात पवार यांनी 6 एप्रिल 2013 रोजीच्या सभेत दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते. तसेच भारनियमनाच्या मुद्द्यावर अश्लील उद्गार काढले होते. यामुळे दुष्काळग्रस्तांसह आपल्या भावना दुखावल्या आहेत. पवार यांच्याविरुद्ध कलम 499 व 509 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी फिर्याद इमामपूरचे शेतकरी राधाकिसन अवारे यांनी न्यायालयात दाखल केली आहे, त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.