आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधश्रद्धेच्या जोखडातून प्रांत कार्यालय मुक्त, मिरजमध्ये नाेटिसीपूर्वी काळ्या बाहुल्या काढल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली-राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झाला असला तरी अनेक सरकारी कार्यालये अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचे दिसते. मिरजेतील प्रांत या कार्यालयाच्या दरवाजात काळी बाहुली बांधल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास अाणून देताच तत्काळ ही बाहुली काढण्यात अाली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अॅड. अमित शिंदे बुधवारी मिरजेतील प्रांत कार्यालयात कामानिमित्त गेले होते. या कार्यालयाच्या दरवाजावरच काळ्या बाहुल्या बांधल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे शिंदे यांनी अंनिसचे रवींद्र चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांना बोलवून प्रांताधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचे ठरवले; मात्र प्रांताधिकारी एका तासानंतर भेटतील, असे टोलवाटोलवीचे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. यावर अॅड. शिंदे हे रीतसर ‘तुमच्यावर जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा का दाखल करून नये’ अशी नोटीस घेऊन गेले असता कार्यालयाच्या दरवाजावर टांगलेल्या उलट्या काळ्या बाहुल्या गायब झाल्या होत्या. शासकीय कार्यालयांतूनच अशी अंधश्रद्धा पाळली जात असेल, तर सामान्यांना आवर कसा घालणार, असा प्रश्न शिंदे यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.