आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारने 25 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा : शेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर-  केंद्र सरकारने केंद्रीय हज कमिटी ऑफ इंडियाला 25 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावेत. यातून केंद्रीय हज कमिटीने विमाने खरेदी करावीत. ही विमाने 10 महिने अन्य विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर देण्यात येतील आणि हज यात्रेच्या काळात हज यात्रेकरूंना सौदी अरेबियामध्ये ने-आण करण्यासाठी हज मिशनवर ही विमाने दोन महिने कार्यरत राहतील. यामुळे हज यात्रेचा खर्च कमी होईल आणि या देशातील गोरगरीब मुस्लीम सुद्धा पवित्र हज यात्रेला जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल, असे महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
 
ते आज आपल्या सरकारी दौऱ्यावर कोल्हापूर येथे हज यात्रेकरूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहण्यासाठी आले होते.  कोल्हापूर येथे औरंगाबाद, नागपूर प्रमाणे प्रशस्त हज हाऊस उभारण्यासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिल्यास केंद्रीय हज कमिटी ऑफ इंडिया त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देईल. राज्य सरकारनेही बांधकामासाठी काही निधीची तरतूद करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 
हज हाऊस उभारल्यास हज यात्रेकरूंना यात्रेपूर्वी त्यांच्या प्रशिक्षण, आणि निवासाची सुलभता निर्माण होईल असेही ते म्हणाले. त्याचबरोबर अमरनाथ यात्रेकरूंवर नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेधही केला. सरकारने अशा दहशतवादी संघटनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या देशात सर्वधर्म समभाव अबाधित राहो आणि हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना सर्व धर्मियांचे सहकार्य लाभो असे आवाहन त्यांनी केले.