आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटगे- मुश्रीफ वादात 2 कार्यकर्त्यांचे बळी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कागल तालुक्यातील राजकीय संघर्षाने पुन्हा टोक गाठले असून रविवारी सकाळी बेलवळे खुर्द येथे झालेल्या गोळीबारात राष्ट्रवादीचे नेते व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे दोन कार्यकर्ते ठार झाले, तर आठ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी घाटगे गटाच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी दोन गटात झालेली बाचाबाची हे तत्कालीन कारण असले तरी तालुक्यातील राजकीय संघर्ष याच्या मुळाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाचाबाचीनंतर सायंकाळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण मिटवले होते. पुन्हा रविवारी सकाळी याच कारणावरून खासदार मंडलिक गटाचे नेते व माजी आमदार संजय घाटगे व मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली, या वेळी हाणामारी दरम्यान घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केल्याचा आरोप मुश्रीफ गटाकडून होत आहे. या वेळी बंदुका, दोन रिव्हॉल्व्हर, हॉकी स्टिक आणि लोखंडी पाइपचा वापर करण्यात आला.
या गोळीबारात मुश्रीफ गटाचे प्रकाश विलास कोतेकर पाटील (वय 24) व रवींद्र आनंदा डोंगळे (वय 27) हे दोघे ठार झाले. तर खासदार सदाशिवराव मंडलिक गटाचे कार्यकर्ते भाऊसाहेब दादासाहेब पाटील (वय 85) यांच्या फुप्फुसात छर्रे घुसल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. या दोघांसह उर्वरित आठ जखमींना तातडीने कोल्हापूर येथील राजारामपुरीतील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु दवाखान्यात येण्यापूर्वीच वरील दोघांचा मृत्यू झाला होता. तर प्रमोद शिवाजी पाटील (वय 22), संदीप केरबा पाटील (26), राजेंद्र शामराव पाटील (25), अभिजित दिनकर कोतेकर (21), राजेंद्र आनंदा डोंगळे (21), प्रकाश चंद्रकांत डोंगळे (30), कृष्णात महादेव पाटील (29) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मंडलिक, मुश्रीफ बाहेर
या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे मुंबई किंवा औरंगाबाद येथे असल्याचे सांगण्यात येत होते, तर खासदार सदाशिव मंडलिक हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. मंडलिक यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी जखमींची चौकशी केली. दरम्यान, कागल तालुक्यातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून बेलवळे खुर्द येथे तर 200 वर पोलिस तळ ठोकून आहेत.

राजकीय संघर्षात 4 बळी
मंडलिक आणि मुश्रीफ एकत्र असताना शाहू कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे आणि संजय घाटगे हे एकत्र होते. या वेळी मंडलिक- मुश्रीम व घाटगेंमधून विस्तव जात नव्हता. मात्र मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात वितुष्ट आल्यानंतर संजय हे मंडलिकांचे समर्थक झाले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.