आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghorpade Sanjay Patil Give Tough Fight To R.R. Patil, Divya Marathi

दिग्गजांच्या लढती: घोरपडे- संजय पाटलांनी आबांना गाठले खिंडीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदी राहिलेले आर. आर. पाटील यांना स्वत:च्या मतदारसंघात निवडून येणेही जिकिरीचे बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्टार प्रचारकाला मतदारसंघातच जखडून ठेवण्याची भारतीय जनता पक्षाची रणनीती काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. भाजपने अजित घोरपडे यांना रिंगणात उतरवले असून सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी घोरपडे यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तीन वेळा तासगावचे आमदार राहिलेल्या दिनकर पाटील यांना आर. आर. पाटील यांनी १९९५ला पराभूत केले होते.
आता दिनकर पाटील यांचे पुतणे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी आबांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. भविष्यात संजय पाटील आपल्याला त्रासदायक ठरतील, हे वळखून आबांनी लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले होते, तरीही ते अभूतपूर्व मताधिक्क्याने जिंकले होते.

आर.आर.पाटील : बलस्थाने
* सिंचन योजनांतून पाणी देण्यात यश
* रस्ते, आरोग्य या पायाभूत सुविधा दिल्या
* दोन्ही तालुक्यांत कार्यकर्त्यांचे मोठे जाळे
* धनगर समाजाला आपल्याकडे वळवण्यात यश
* स्वच्छ प्रतिमा, राज्याचा नेता म्हणून ओळख
उणिवा
* मतदारसंघातील तरुण मतदारांशी संवादाचा अभाव
* गावोगावी गटातटांतून निर्माण केलेला संघर्ष
* ठेकेदार कार्यकर्त्यांचे कोंडाळे
* सरकारची गमावलेली विश्वासार्हता

अजित घोरपडे : बलस्थाने
* मोदींच्या सभेमुळे वातावरण लाभदायक
* १५ वर्षे आमदार राहिल्याने मोठा जनसंपर्क
* म्हैसाळ योजना मंजूर करण्यात महत्त्वावाची भूमिका
* मोदींच्या सभेनंतर बदललेले वातावरण
* संजय पाटील यांचे भक्कम पाठबळ
उणिवा
* गमावलेली राजकीय विश्वासार्हता
* गेल्या पाच वर्षांत जनसंपर्क कमी
* सामाजिक गैरवर्तन केल्यामुळे दुरावलेले विविध समाज घटक तापदायक
ठरणार
* तासगाव तालुक्यात स्वत:ची कमी ताकद

मोदी सभेने वा-याची दिशा बदलली
२००९ मध्ये करण्यात आलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत आर. आर. पाटील यांच्यासाठी अजित घोरपडे यांना माघार घ्यावी लागली होती. कवठे महांकाळचे कॉंग्रेसकडून तीनदा आमदार राहिलेल्या अजित घोरपडे यांना भारतीय जनता पक्षाच्या रूपाने आता सक्षम पर्याय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगलीऐवजी तासगावला आणून आर. आर. पाटील यांना पुरते घेरण्याची रणनीती आखली गेली. नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी मतदारसंघातील वातावरण भाजपला फारसे पोषक नव्हते; मात्र सभेनंतर वारे पुन्हा भाजपच्या दिशेने वाहू लागले आहेत.

प्रतिष्ठा अन् अस्तित्व पणाला
कवठे महांकाळला धनगर समाजाची मते सर्वाधिक आहेत, त्यामुळे काँग्रेसने माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचा मुलगा सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांना उमेदवारी दिली आहे. आर.आर. पाटील हे प्रतिष्ठा जपण्यासाठी लढत आहेत. अजित घोरपडे हे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तर काँग्रेस आणि शिवसेनेसह अन्य सर्व उमेदवार आपले डिपॉझिट वाचवण्यासाठीच संघर्ष करत आहेत.
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते व भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी आता आबांना घरी बसवण्यासाठी सारी शक्ती लावली आहे. त्यामुळे ही निवडणूक आर. आर. विरुद्ध घोरपडे अशी न राहता आर. आर. विरुद्ध संजय पाटील अशीच झाली आहे.

जातीय गणिते मोडीत निघाली
हा मतदारसंघ तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन तालुक्यांचा मिळून तयार झाला आहे. तासगावमध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आर. आर. पाटील आणि संजय पाटील असा संघर्ष कायम आहे. २००९ चा अपवाद वगळता आर. आर. पाटील यांना या मतदारसंघात सतत संघर्ष करावा लागला आहे. कवठे महांकाळचे राजकारण वेगळे आहे. यापूर्वी कवठे महांकाळचे राजकारण जातीय समिकरणांवर आधारीत होते. यावेळी दोन्ही उमेदवार मराठा समाजाचेच असल्याने जातीची समिकरणे पहिल्यांदाच मोडीत निघाली आहेत.