आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यात तहानलेल्या बालिकांचा विहिरीत बुडून मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - बाटलीभर पाणी काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोन तहानलेल्या बालिकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रायक घटना बुधवारी औंध (ता. खटाव) येथे घडली. सातारा जिल्ह्यात दुष्काळाचे चटके तीव्र असल्याने सर्वत्र टंचाई जाणवत आहे. याच पाणीटंचाईने दोन बालिकांचा बळी घेतला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी एक छोटी वस्ती आहे. याच ठिकाणी लक्ष्मी होलराम जयस्वाल (वय 11) ही मुलगी आपले मामा भाऊसाहेब रणदिवे यांच्याकडे लहानपणापासून राहत होती. तिचे पालनपोषण रणदिवे यांनीच केले, तर प्रतीक्षा कीर्तिकर (वय 10) ही मुलगीसुद्धा चार दिवसांपूर्वी या वस्तीवर आपल्या मामाकडे आली होती. बुधवारी लक्ष्मी जनावरांना चारण्यासाठी शेरी शिवारात गेली होती. प्रतीक्षाही तिच्यासोबत गेली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास तहान लागल्याने दोघी जवळच असलेल्या मारुती मंदिरामागील विहिरीत पाणी काढण्यासाठी उतरल्या होत्या. बाटली भरत असताना एकीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली व तिला वाचविण्यासाठी दुसरीही पाण्यात उतरली. मात्र दोघींचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, शिवारात दिवसभर कोणीही नव्हते, त्यामुळे घटनेची माहिती कोणालाच कळाली नाही. सायंकाळी मुली घरी परत का आल्या नाहीत, म्हणून नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. शेरी शिवारातील विहिरीजवळ शोध घेतला असता त्या पाण्यात पडल्याचे दिसले. नागरिकांनी त्यांना बाहेर काढून औंध ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

गावी जाण्यापूर्वीच काळाचा घाला- घटनेची माहिती कळताच वस्तीवरील सर्वच नागरिकांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. या दोघींच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लक्ष्मी आपल्या मामीबरोबर गावी जाणार होती, परंतु तत्पूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. खटावच्या तहसीलदार वैशाली राजमाने यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.