आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, सहा जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - गल्लीतील मुलांकडून सातत्याने होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून बोंद्रेनगर परिसरातील पल्लवी गणपती बाडेकर या १७ वर्षांच्या तरुणीने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संशयावरून सहा जणांना अटक करण्यात आली. या छेडछाडीबाबत आधीही पोलिसांकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल संताप व्यक्त करून मुलीच्या नातेवाइकांनी संशयितांच्या घरावर दगडफेक केली.

शहरातील बोंद्रेनगर परिसरातील धनगरवाड्यावर पल्लवी आणि तिची छोटी बहिणी व निकिता आजीसह राहतात. आई-वडील नसल्याने या तिघींचाच एकमेकीला आधार हाेता. पल्लवी धुणी-भांडी करून उदरनिर्वाह चालवते. यातूनच धाकट्या बहिणीचे शिक्षणही सुरू आहे. याच गल्लीतील देवाप्पा बैजू बोडके, त्याचा भाऊ चंदू बैजू बोडके, राजू सोनबा शेळके, त्याचा भाऊ संजय शेळके, चुलतभाऊ पांडुरंग व बबन शेळके हे गेले काही महिने पल्लवीला त्रास देत असत. तिच्या पाठीमागून गाड्या घेऊन फिरणे, शेरेबाजी करणे, धमक्या देणे असे प्रकार त्यांच्याकडून सुरू असत. याबाबत पल्लवीच्या नातेवाइकांनी तसेच वसाहतीतील ज्येष्ठांनी या मुलांना समजावून सांगितले होते. मात्र काहीच फरक पडला नाही. अखेर याबाबत पोलिसातही तक्रार देण्यात आली. परंतु याबाबत कठोर कारवाई न झाल्याने या टोळक्याने आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली.

रविवारी सकाळी पल्लवी कामावर जाताना तिची छेड काढण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या पल्लवीने रात्रीच्या सुमारास घरातच गळफास घेतला. अात्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठीत या सहा जणांची नावे लिहून त्यांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. ही बातमी कळताच संतप्त जमावाने संशयितांच्या घरावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला शांत केले. सर्व संशयितांना राधानगरी तालुक्यात अटक करण्यात आली आहे.

कुणाचाच आधार नाही
पल्लवीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले तर दुचाकीला धडकल्याने तिच्या आईचाही मृत्यू झाला. अशा परिस्थितीत या तिघी बहिणीच घरी राहत होत्या. मोठ्या दोन बहिणींचा विवाह झाला आहे. आपल्याला पाठबळ देणारं कुणीच नाही या भावनेतून निराश होऊन अखेर पल्लवीने आपली जीवनयात्रा संपवली.
बातम्या आणखी आहेत...