आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाॅट‌्स अॅपमुळे मदत: डॉल्बीने आणले अपंगत्व; मित्रांनी घेतले पालकत्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - साेशल मीडियाचा चांगल्या कामासाठीही वापर करता येतो हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील संदीप टिळे या तरुणाच्या मित्रांनी दाखवून दिले आहे. डॉल्बीच्या दणदणाटाने जन्माचे अपंगत्व आलेल्या संदीपच्या देश-विदेशात असलेल्या मित्रांनी केवळ महिन्यात त्याच्यासाठी दोन लाख रुपयांची मदत जमा केली आणि त्याच्या मुलांचे पालकत्व स्वीकारले.

संदीप हा मूळचा इस्लामपूरचा. नोकरीच्या निमित्ताने तो कोल्हापूरला राहायचा. तीन-चार वर्षांपूर्वी गणेशोत्सव मिरवणूक पाहायला तो गेला असता डॉल्बीच्या दणदणाटाने एक भिंत कोसळली. संदीपसह तिघे त्याखाली दबले गेले. त्यात एकाचा जीव गेला. तर संदीपच्या मज्जासंस्थेला गंभीर दुखापत झाली. त्याचा मणका निकामी झाला आणि कमरेखाली कायमचे अपंगत्व आले. पदरी दोन मुले आणि पत्नी. घरच्यांनी त्याच्यावर उपचार करण्यासाठी मदत नाकारली. डॉक्टरांनी संदीप पुन्हा स्वत:च्या पायावर चालू शकणार नाही, असे सांगितले. पत्नी शुभांगी हिच्यावर आभाळच कोसळले. मोठ्या हिमतीने तिने कोल्हापुरात नोकरी शोधली आणि ती एका छोट्याशा खोलीत अपंग पतीसह दोन मुलांचा सांभाळ करू लागली. इस्लामपूर येथे शिक्षण घेत असताना संदीपचा मोठा मित्रपरिवार होता. संदीपवर ओढवलेल्या प्रसंगाची त्याच्या मित्रांना कल्पनाच नव्हती. जून महिन्यात एका मित्राला या संकटाची माहिती मिळाली. तो अस्वस्थ झाला. अापला जिवाभावाचा मित्र संदीपसाठी काहीच करू शकत नाही का? असे त्याला वाटले. मग त्याने व्हॉट््सअॅपवरून संदीपशी संबंधित सर्व मित्रांना ही माहिती दिली. इस्लामपूर येथील काही मित्र कोल्हापूरला जाऊन त्याला भेटून आले. त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली आणि त्यांनी संदीपसाठी निधी जमा करायचे ठरवले. एक महिन्याच्या आत संदीपच्या पुणे, मुंबई, दुबई, सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, सांगोला, सातारा, सुरत अशा शहरांत राहणाऱ्या मित्रांनी दोन लाख रुपयांची मदत जमा केली.

राज्य सरकारकडून घरकुलाची अपेक्षा
डॉल्बीच्या दणदणाटाने झालेल्या अपघातात संदीप जखमी हाेऊन कायमचा अधू झाला. तो सध्या अंथरुणावरून उठूही शकत नाही. एवढा मोठा अपघात होऊनही ना संबंधित मंडळाने संदीपला काही मदत केली ना सरकारने. छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या संदीपला सरकारकडून राहायला एखादे घरकुल मिळावे, अशी अपेक्षा त्याच्या मित्रांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचाही संकल्प केला.
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
१५ आॅगस्ट राेजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते संदीपची पत्नी शुभांगी यांच्याकडे ही रक्कम एफडी स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. संदीपची मुले सध्या शालेय शिक्षण घेत आहेत. त्यांची पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी संदीपच्या मित्रांनी स्वीकारली आहे. संदीपला आपल्या मित्रांच्या संपर्कात राहता यावे म्हणून मित्रांनी त्याला मोबाइल हँडसेटही दिला आहे. हा सोहळा घराबाहेर सुरू असताना संदीप अंथरुणावरून उठू शकत नव्हता. घरच्यांनी नाकारलेल्या संदीपला मित्रांनी दिलेले प्रेम पाहून अश्रू आवरत नव्हते.