आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gopinath Munde News In Marathi, Nationalist Congress, Sharad Pawar

बीडमध्येच कोंडी करण्याची भाषा करणा-यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल- गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी कोल्हापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांची जाहीर सभा झाली. - Divya Marathi
राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी कोल्हापूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांची जाहीर सभा झाली.

कोल्हापूर - ‘गोपीनाथ मुंडे यांची बीडमध्येच कोंडी करण्याची भाषा करणा-यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. स्वाभिमानी संघटनेचे खासदार व हातकणंगले येथील महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा अर्ज दाखल केल्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.


‘लोकसभेला बावीसच जागा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसणा-या शरद पवार यांना शेट्टी यांच्याविरोधात उमेदवारच मिळाला नसल्याने त्यांनी कॉँग्रेससमोर सपशेल लोटांगण घातले,’ अशी टीका करतानाच ‘रेणुका शुगर’चा फायदा करून देणा-या, शेतक-यांचे साखर कारखाने विकणा-या आबा, बाबा आणि दादाला आता हद्दपार करा,’ असे आवाहनही मुंडे यांनी जनतेला केले.


‘शरद पवार यांनी माढ्यातून पळ काढला आणि ते राज्यसभेवर गेले. हातकणंगलेमध्ये उमेदवार शोधण्यासाठी सात बैठका झाल्या; पण त्यांना उमेदवार मिळाला नाही. म्हणून ही जागा कॉँग्रेसला देण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. पवार यांनी केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतक-यांचे हित पाहिले नाही. मात्र, रेणुका शुगर्स कंपनीला मात्र झुकते माप दिले. पवार आणि या कंपनीचे काय संबंध आहेत याची चौकशी आमचे सरकार करेल,’ अशी घोषणाही मुंडेंनी करून टाकली.


‘पोलिसाच्या मृत्यूसाठी शेट्टी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेल्या शासनाने 60 हजार कोटींचा जलसिंचन घोटाळा करणा-या अजित पवारविरोधात गुन्हा का दाखल केला नाही?’ असा सवाल विचारतानाच ‘गरज पडल्यास दिल्लीहून मुंबईत येऊ,’ असे संकेतही मुंडेंनी दिले. या वेळी सांगलीचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक उपस्थित होते.


पवार व्यापा-यांचे दलाल : शेट्टी
दिल्लीत बसून शरद पवार हे व्यापा-यांचे दलाल असल्याची भूमिका घेतात आणि सर्वसामान्य शेतक-यांसाठी मला आणि मुंडे यांना लोकसभेत भांडावे लागते. गेल्या लोकसभेला मंडलिक व मी या दोन दाढ्यांनी पवार यांना हिसका दाखवला होता.


आता तर महायुतीची साथ आहे, त्यामुळे यंदाही त्याचीच पुनरावृत्ती करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी केली. आंदोलन केले म्हणून आमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणा-यांनी मावळच्या शेतक-यांवर गोळीबार करण्याचे आदेश देणा-या अजित पवारांवर गुन्हा का दाखल केला नाही, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.


ऊसदरासाठी प्रसंगी मुंडेंच्या कारखान्यासमोरही आंदोलन
‘आम्ही महायुतीत आलो म्हणजे मूळ प्रश्न सोडला, असे होत नाही. मुंडेसाहेब तुमच्या देखत सांगून ठेवतो की, ऊस दरासाठी वेळ पडली तर तुमच्याही कारखान्याच्या दारात आम्ही आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही,’ असे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. त्याला उत्तर देताना ‘आम्ही असा दर देऊ की तुम्हाला आंदोलनच करावे लागणार नाही,’ असा प्रतिटोला मुंडेंनी लगावला.


पार्लमेंटमध्ये शिट्टी
राजू शेट्टी यांचे निवडणूक चिन्ह शिटी असल्याचा आधार घेत रामदास आठवले यांनी या सभेत कविताच सादर केली.
आता लवकरच होणार आहे काँग्रेस राष्‍ट्रवादीची सुट्टी,
पार्लमेंटमध्ये जाणार आहे
राजू शेट्टींची शिट्टी, महायुतीची आता जमली आहे गट्टी!
या काव्यपंक्तींना उपस्थितांनी दाद दिली.


उमेदवार बदलणार नाही : मुंडे
संजयकाका पाटील यांना सांगलीतून मी उमेदवारी दिली आहे. ती बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत गोपीनाथ मुंडे यांनी नाराज आमदार संभाजी पवार यांना फटकारले. संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. ‘मी बेरजेचे राजकारण करणारा राजकारणी आहे. संभाजी पवार माझे मित्र आहेत. त्यांचीही नाराजी लवकरच दूर होईल.’