आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमरेड पानसरे हत्या प्रकरण: आरोपी समीर गायकवाडला जामीन, सरकारी वकीलांची हायकोर्टात धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. - Divya Marathi
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर - पंचवीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आज कोल्हापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कॉम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने काही अटींच्या अधीन राहून त्याला हा जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी.बिले यांच्या न्यायालयात समीरच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.गेल्या २१ महिन्यांपासून समीर गायकवाड हा कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैदेत होता. 

न्यायालयाने समीर गायकवाडला घातलेल्या अटीत त्याला महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जामीनकाळात समीर गायकवाड याला तो रहात असलेला पत्ता पोलिसांना कळवणे बंधनकारक केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायलाही बंदी घालण्यात आली आहे.दर रविवारी ११ ते २ यावेळेत त्याने विशेष तपास पथकाच्या कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. समीरने आपल्या वर्तनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी.साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालय त्याची गंभीर दखल घेईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला एसआयटीने १६ सप्टेंबर २०१५ ला अटक केली होती. त्याच्या जामीनासाठी यापूर्वी चारवेळा सुनावणी झाली.आज न्यायालयाने त्याच्या चौथ्या जामीन अर्जावर निकाल दिला.यावेळी सनातन संस्थेचे साधक मोठ्या संख्येने न्यायालयात उपस्थित होते.

समीर गायकवाड याचे वकील समीर पटवर्धन यांनी मांडलेल्या युक्तिवादात सरकार पक्षाने सांगितले होते की दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल कॉ.पानसरे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आले.मात्र दाभोलकरयांच्या हत्येनंतर ते पिस्तुल पुणे पोलिसांनी जप्त केले होते.आणि त्यानंतर ते सीबीआयकडे तपासासाठी देण्यात आले होते.तर मग पानसरे यांच्या हत्येमध्ये तेच पिस्तुल कसे वापरण्यात आले.? असा सवाल त्यांनी केला.त्याचबरोबर कॉ.पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी ओळखपरेड मध्ये सारंग आकोळकर आणि विनय पवार याला ओळखले होते.समीर गायकवाड याला त्यांनी ओळखले नाही त्यामुळे समीरचा या हत्येत सहभाग नसल्याचे उघड होते असे ते म्हणाले. तसेच पानसरे हत्येचा तपास सुरु आहेच आणि तो सुरु राहणार आहे.हा तपास कधी संपेल माहिती नाही तोपर्यंत समीर गायकवाड याला कारागृहात कसे ठेवायचे ?या तीन महत्वाच्या मुद्यावर केलेल्या युक्तिवाद ग्राह्य मानून न्या.एल.डी.बिले यांनी समीर गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. 

कॉ.गोविंदराव पानसरे त्यांच्या कोल्हापुरातील सागरमाळ परिसरातील घरापासून मॉर्निंग वॉकहून परत येताना त्यांच्यासह पत्नी उमा पानसरे यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चार मारेकऱ्यांना १६ फेब्रुवारी २०१५ ला गोळीबार केला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारीला उपचार सुरु असताना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत्यू झाला होता. उमा पानसरे यांच्याही डोक्याला गोळी चाटून गेली होती परंतू त्यातून त्या बचावल्या. त्यानंतर विशेष तपास पथकांने ‘सनातन’ संस्थेचा पूर्ण वेळ साधक असलेल्या समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ अटक केली होती. तेव्हा पासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.
 
उच्च न्यायालयात अपील करणार – विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर 
- वास्तविक उच्च न्यायालयाने यापूर्वीच समीर गायकवाड याला जामीन फेटाळला आहे. त्यामुळे या न्यायालयाने त्याला जामीन देणे उचित नाही. आम्ही हा जामीन रद्द रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
- समीर गायकवाड याला जामीन देण्यात येवू नये यासाठी आपल्या युक्तिवादात अनेक खटल्यांचे दाखले दिले होते.समीर विरुद्ध भक्कम पुरावे असताना सुद्धा त्याला जामीन मिळाला.
- त्यामुळे आता आम्ही समीरला देण्यात आलेला जामीन रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालयात अपील करणार आहे.असे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर म्हणाले. 
 
कॉ.गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे म्हणाल्या...
समीर गायकवाड याची जामिनावर सुटका झाल्याने साक्षीदारांवर बळाचा वापर होण्याची शक्यता आहे. पानसरे कुटुंबियांच्या वतीने उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करू.
 सनातनच्या साधकांसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी समीर गायकवाड याला जामीन मंजूर झाल्याचे समजताच न्यायालयाच्या बाहेर पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. समीर गायकवाड याला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कळंबा कारागृहातून जिल्हा व सत्र न्यायालयात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. त्यावेळी तो निर्विकारपणे आरोपींना बसवण्यात येत असलेल्या ठिकाणी बसला होता.
 
पुढील स्लाईडवर वाचा... हिंदुत्ववादी संघटनांचे काय म्हणणे आहे?
बातम्या आणखी आहेत...