आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे तपासात फडणवीस सरकारची भूमिका संशयास्पद - राधाकृष्ण विखे पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या आणि नंतरच्या तपासामध्ये फडणवीस सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. शनिवारी सकाळी पानसरे यांच्या निवासस्थानी त्यांनी नातेवाइकांची भेट घेतली. यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली.
विखे पाटील म्हणाले, सरकार या प्रकरणात कशा पद्धतीने हस्तक्षेप करत आहे हे मालेगाव तपासावरून दिसून आले आहे. साध्वी व कर्नल पुरोहित यांना क्लीन चिट देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच या प्रकरणातही राज्य सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्यानेच हा तपास सीबीआयकडे देण्यात आला असावा. शिना बोरा प्रकरण अखेरच्या टप्प्यात असतानाही हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले आहे. मात्र, पुरोगामी नेत्यांची हत्या होऊनही त्याबाबत राज्य शासन निर्णय घेत नाही यातच त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असेही ते म्हणाले.
अशा संस्थांमुळे स्वातंत्र्यावर गदा
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे सनातन संस्थेपर्यंत पोहोचले आहेत. वैचारिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर अशा प्रकारच्या संस्था गदा आणत असून ते महाराष्ट्रातील संस्कृतीला साजेसे नाही. अशा संस्थांवर बंदी घालण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
सनातनवर बंदी घाला
सनातनला सुरुवातीलाच क्लीन चिट देणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता जाहीर माफी मागावी, अशी मागणी करून आपण मुख्यमंत्र्यांना भेटून सनातनवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. जर धाडस असेल तर सनातनवर बंदी घालून राज्यातील जनतेची संभ्रमावस्था सरकारने संपवावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
बंदीची मागणी संधिसाधूपणा
मुंबई - सनातनच्या एका साधकाला केवळ संशयावरून पोलिसांनी अटक केल्यानंतर अध्यात्मप्रसार करणाऱ्या सनातन संस्थेवरच बंदीची मागणी करणाऱ्या काँग्रेसची घाई निषेधार्ह आहे, अशी टीका सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली. वर्तक म्हणाले, एखाद्या वर्गातील विद्यार्थी चुकला तर शिक्षक संपूर्ण वर्गाला शिक्षा करत नाहीत. सनातनच्या एका साधकाला केवळ संशयित म्हणून अटक झाली आहे. मात्र, काँग्रेस सनातनवर बंदी घालण्याची घाई करत आहे, हा काँग्रेसचा संधिसाधूपणा आहे. काँग्रेसला सनातनवर बंदी घालायचीच होती, तर ती त्यांनी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना का घातली नाही ? केवळ सवंग लोकप्रियता मिळवून देणारी संधी साधण्यासाठी अशोक चव्हाण व इतर काँग्रेस नेते सनातनवर बंदीचा मागणी करत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. त्यांची मागणी जर नैतिक असती तर शिखांचे हत्याकांड घडवल्याबद्दल त्यांनी स्वतःच्या पक्षावरच प्रथम बंदी घातली असती, असेही वर्तक म्हणाले.
राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास वेगाने व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकरणात शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. म्हणून सनातनचा कार्यकर्ता अटक होऊ शकला हे वास्तव आहे. याबाबत स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांनी काही बोलण्याची गरज नाही, असा पलटवार सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला. पाटील म्हणाले, आरोप करण्याची विखे पाटील यांची जुनी सवय आहे. उलट या प्रकरणामध्ये शासन तपास अधिकाऱ्यांना मानसिक आणि अन्य आवश्यक ती मदत करण्यासाठी बांधील आहे. इतक्या किचकट प्रकरणातूनही पोलिस अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने तपास केल्याचे ते म्हणाले. आहे. त्यामुळे यादरम्यान पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिस्टीमनुसार कारवाई होणार
सनातनवरील बंदीबाबत विचारणा केली असता पाटील म्हणाले, सनातनच्या संबंधात या प्रकरणामध्ये जी माहिती पुढे येईल ती माहितीच या संघटनेचे पुढचे भवितव्य ठरवेल. कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठीची एक प्रक्रिया असते. त्या निकषांमध्ये जर ही संघटना बसत असेल तर सरकार त्या पध्दतीने कार्यवाही करेल, असेही पाटील यांनी सांगितले.