आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्त धान्य घोटाळ्यातील दोषींना अभय देणार नाहीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून एकूण ११ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असली तरी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचे धान्य कुठे, कसे, कुणामार्फत जाते याचा पत्ता लागत नाही. त्यामुळेच याची शोधमोहीम सुरू आहे. यातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत मी सोडणार नाही, अशी ठोस भूमिका अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली.

बापट म्हणाले, गायब केले जाणारे कोट्यवधी रुपयांचे धान्य वाचले तर दारिद्र्य रेषेवरील लोकांनाही ते देता येईल. अन्न सुरक्षा कायद्यातून अशा लोकांना वगळण्यात आले आहे. मात्र, लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मागच्या सरकारने १५०० कोटी रुपयांचे अन्नधान्य अशांना वितरित केले. मात्र, रास्त भाव दुकानांमध्ये आधार कार्ड संलग्न बायोमेट्रिक पद्धत लागू केल्याशिवाय यातील घोटाळे बाहेर येणार नाहीत. त्यासाठी शासनाने १०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात दुकानदारांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांचेही कमिशन वाढवणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

नाबार्डच्या सहकार्याने राज्यामध्ये गोदामे उभारली जात असून त्यामुळे धान्य खराब होण्याचे प्रकार टळतील. गेल्या वर्षभरात विभागाने ५० कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच राॅकेलच्या टँकरना जेपीएस सिस्टिम बसवणार आहोत. राज्यभरात ३०० जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार अमल महाडिक, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महसूलच्या अधिकार्‍यांनी बहिष्कार मागे घ्यावा
सुरगणा येथील ३००० टन क्षमतेच्या गोदामामध्ये ३२ हजार टन धान्य पाठवून तेथे सात कोटी ८४ लाख रुपयांचा काळाबाजार करण्यात आला. याप्रकरणी तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काही तहसीलदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे महसूलच्या अधिकार्‍यांनी कामावर बहिष्कार घातला आहे. मात्र, मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी कामावर हजर व्हावे. जे निर्दोष आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई झाली तरी तुम्ही बहिष्कार घालणार आहात का, असा सवालही बापट यांनी या वेळी केला.
बातम्या आणखी आहेत...