आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Greenary In Drought: People Collect Money For Surview Fruits Trees

दुष्काळातील पालवी: लोकवर्गणीतून फळबागांसाठी पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - दुष्काळी जिल्ह्यांमध्ये फळशेतीचा प्रयोग आता नवा नाही; पण फळझाडे लावायलाही पैसा नाही, असे अनेक शेतकरी फळशेतीच्या क्रांतीपासून कोसो दूर आहेत. त्यांच्यापुढे शेतमजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. अशा दरवर्षी ऊसतोडीसाठी कृष्णाकाठी स्थलांतर करणा-या आटपाडी तालुक्यातील हिवतड या गावातील १० कुटुंबांना फळशेतीसाठी मदतीचा हात देऊन क्रांतिस्मृतिवन प्रतिष्ठान व आभाळमाया फाउंडेशनने आशेचा किरण जागवला आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणारा तालुका. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी तालुक्यात आले; पण ते ठरावीक भागात आणि अनियमित. वार्षिक पाऊसही जेमतेम. अशा स्थितीत शेतक-यांपुढे शेती पिकवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असतानाही मजुरीवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे, या
भावनेतून बलवडीच्या क्रांतिस्मृतिवन प्रतिष्ठानचे संपतराव पवार यांनी या भागात यशस्वी झालेल्या फळशेतीसाठी या अल्पभूधारक कोरडवाहू शेतक-यांना लोकवर्गणीतून आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. त्याला या शेतक-यांनीही तयारी दर्शवली.

आटपाडी तालुक्यातील हिवतड गावातील १० शेतक-यांची त्यांनी या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली आहे. या शेतक-यांना डाळिंब झाडांची लागण करण्यासाठी खड्डे खणून देणे, पाण्याची उपलब्धता करून देणे, सेंद्रिय खत, औषधांसाठी येणारा खर्च देणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे ही जबाबदारी क्रांतिस्मृतिवन आणि आभाळमाया फाउंडेशन यांनी संयुक्तपणे घेतली आहे. नुकतीच या भागात डाळिंब रोपांची लागण करण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता आजूबाजूच्या शेतक-यांच्या सहकार्यातून करण्यात आली आहे.

असा असेल प्रकल्प
*प्रति शेतकरी ४० हजार रुपये खर्च
*प्रत्येकी एक एकर क्षेत्रात डाळिंब लागवड
*प्रति झाड वार्षिक ४०० लिटर पाण्याची आवश्यकता
*त्याप्रमाणे २०० झाडांना ८० हजार लिटर पाणी देणार
*सायफन पद्धतीने झाडांना पाणीपुरवठा
*पाणी साठवणुकीसाठी सिंथेटिक टाक्यांचा पुरवठा
*सेंद्रिय खतांवर झाडांचे संगोपन
*बागांची जबाबदारी शेतक-यांची

शेतक-यांनो आत्महत्या नकोत
‘‘केवळ पाण्याअभावी शेती पिकत नाही, म्हणून शेतक-यांनी आत्महत्या करू नयेत, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. हा प्रकल्प नक्की यशस्वी होईल आणि तो संपूर्ण महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतक-यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा आमचा विश्वास आहे. त्यासाठी लोकांचाही मदतीचा हात मिळायला हवा.’’ संपतराव पवार, प्रकल्पाचे जनक