आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक स्टार्टअप: भाळी कुंकू, गळा मंगळसूत्र; विधवांना नवे सन्मानसाैख्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- पतीचे अकाली निधन झाले, त्यात महिलांचा काय दाेष? पण समाजाने विधवा म्हणून त्यांना कोणत्याही शुभकार्यापासून दूर ठेवले. सामाजिक बंधनाची ही बेडी तोडून आपल्याला महिला म्हणून समाजाने स्वीकारावे, यासाठी त्या रविवारी एकत्र आल्या. कपाळी कुंकू लावले, गळ्यात मंगळसूत्र घातले आणि नव्या विश्वासाने जगण्याची नवी ऊर्मी घेऊन जीवनप्रवास सुरू केला.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील लतादेवी बोराडे या विधवा महिला. त्यांनी विधवांच्या उद्धारासाठी सहाच महिन्यांपूर्वी विधवा महिला विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने त्यांनी आधी तालुक्यातील विधवांची माहिती एकत्रित केली. विधवा महिला म्हणजे समाजाच्या दृष्टीने दुर्लक्षित स्त्री. मात्र तीही कर्तृत्ववान असू शकते, हे लतादेवी यांनी स्वत: दाखवून दिले. लग्नानंतर महिनाभरातच पतीचे निधन झाले आणि त्यांच्यावर आभाळच कोसळले. पुढे अंधार होता; पण खचून न जाता त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. डी. एड. पूर्ण करून त्या वस्तीशाळेवर हंगामी शिक्षक म्हणून नोकरीस लागल्या. नंतर त्यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची कायमस्वरूपी नोकरी मिळाली आणि जीवनात आर्थिक स्थैर्य आले. असे असले तरी समाजात स्त्री म्हणून स्थान नव्हते. विधवा म्हणून कोणत्याही शुभकार्यात अपमानास्पद वागणूक मिळायची. हे बदलण्यासाठी त्यांनी हिरवा चुडा, मंगळसूत्र आणि कपाळी कुंकू लावून समाजात वावरण्याचा निर्णय घेतला. विधवा म्हणून समाजात हिणकस वागणूक मिळणारया महिलांना एकत्र करून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जून २०१५ मध्ये त्यांनी विधवा महिला विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. या उपक्रमात आणखी काही महिलांना सहभागी करून घेता येईल का, यादृष्टीने त्यांनी सांगलीतील ‘मैत्रीण’या महिला संघटनेच्या प्रमुख नीता केळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही या पुरोगामी निर्णयाचे स्वागत करत आणखी काही महिलांना एकत्र केले.
रविवारी डेक्कन हॉलमध्ये जाहीर कार्यक्रम घेऊन २० ते २५ महिलांच्या कपाळी कुंकू लावून त्यांची ओटी भरण्यात आली. त्यांना मंगळसूत्र दिले आणि हातात हिरवा चुडा भरला आणि यापुढे पुन्हा एक सामान्य स्त्री म्हणून समाजात ‘भरल्या कपाळाने’ वावरण्याचा ठाम निर्धार केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका तारा भवाळकर, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या पत्नी वंदना, पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांची पत्नी वंदना यांनी पाठबळ दिले.
माजी मंत्र्यांच्या पत्नीची भरली ओटी
सांगलीचे माजी मंत्री मदन पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पत्नी जयश्रीही कार्यक्रमाला आल्या. मंगळसूत्र व हिरवा चुडा देऊन त्यांची ओटी भरली. जयश्री म्हणाल्या, ‘मदनभाऊ गेल्यावर पाचव्या दिवशी मी मन खंबीर केले. महिलांनी स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे.’
^ विधवांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठीच हा कार्यक्रम घेतला. मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून यापुढे विधवा महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.’ - लतादेवी बोराडे
^मला सासरी,माहेरीही पाठबळ मिळाले. आधी कुटुंबीयांनीच हा बदल स्वीकारावा. शुभकार्यात विधवांना मान द्यावा.’ - राजश्री मोटे
^कोणत्याही महिलेच्या नावापूर्वी कुमारी, सौभाग्यवती किंवा श्रीमती असे न लावता ‘सुश्री’ असेच विशेषण लावावे. म्हणजे भेदाभेद मिटेल’ - तारा भवाळकर
^विधवा महिला विकास प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या महिला धाडसी आहेत. त्यांच्या कार्याला पाठबळ म्हणून हा हळदी-कुंकू कार्यक्रम घेतला. त्यांना आम्ही ‘सौभाग्यवती’ म्हणून स्वीकारले आहे. समाजानेही त्यांचा स्वीकार करावा.’- नीता केळकर