कोल्हापूर - गेली पंधरा वर्षे संघर्ष केल्यानंतर या वेळी विधानसभेला मोठ्या फरकाने विजय झाला. शिवसेनेचा भगवा घेऊन एका साखर कारखान्यातील कामगाराचा मुलगा, चाळिसाव्या वर्षी त्याच कारखान्याच्या अध्यक्षांचा पराभव करून निवडून आलेला. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर त्यांचे नाव. राजकीय आयुष्यातील पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनासाठी ते उत्साहाने सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. मात्र तासाभरातच आईच्या मृत्यूची बातमी समजताच आल्या पावली ते गावाकडे परतले.
राधानगरीचे आमदार आबिटकर यांच्या मातोश्रींची प्रकृती गंभीरच होती. मात्र डॉक्टरांच्या परवानगीने आबिटकर नागपूरला पोहोचले. सकाळी अधिवेशनाकडे जाण्याआधीच त्यांना आईच्या मृत्यूची बातमी समजली. तातडीने माघारीचा रस्ता धरून विमानाने मुंबईत आले. तेथून गाडीने कोल्हापुरात आले व रात्री दहाच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.