आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली , पुराच्या पाण्यात अडकल्या 5 बस, मदतकार्य सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे प्रमुख नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीने 39 फुटाची धोका पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, शुक्रवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर- गगनबावडा राज्य मार्गावर किरवे गावाजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने 5 खासगी बस आणि 4 ट्रक अडकल्या आहेत. गोव्याकडून या बस येत होत्या. बसेसमध्ये सुमारे 250 प्रवासी आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मदत कार्य सुरु करण्‍यात आले आहे.

किरवेच्या गावकर्‍यांनी केली चहा-नाष्ट्याची व्यवस्था...
किरवे गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी चहा-नाष्‍ट्याची व्यवस्था केली आहे. तसेच या ठिकाणी आपत्कालीन बोट पाठवून मदतकार्य सुरू करण्यात आले असून सर्व प्रवाशांना साळवण या गावातील प्राथमिक शाळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
 
बॅरेकेटींग बाजूला करून पुढे घेतल्या बस...
कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनबावडा हा तालुका अतिशय डोंगराळ आणि दुर्गम तालुका आहे. त्यामुळे या परिसरात सद्या अतिवृष्टी होत आहे. नद्यानाल्यांना पूर आला आहे. राज्यमार्गावर कासारी नदीला आलेल्या पुराचे पाणी आल्याने जिल्हा प्रशासनाने या रस्त्यांवर रात्रीच सुरक्षेसाठी बॅरेकेटिंग लावले होते. मात्र, गोवा राज्यातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या 5 खासगी बस आणि 4 ट्रक चालकांनी ही बॅरेकेटिंग काढून आपली वाहने पुराच्या पाण्यातून रस्त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. पुराचे पाणी वाढलेले असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने ही वाहने पुराच्या पाण्यातच अडकून पडले आहेत.

खासगी बसेसमध्ये जवळपास 250  प्रवासी प्रवास करत आहेत. किरवे गावच्या सरपंचांना ही माहिती मिळतात ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी या पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या प्रवाश्यांना व ट्रक मधील चालकाना चहा- नाष्टा पोहोचवला असून गगनबावडा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून मदत कार्याची मागणी केली आहे आज सकाळी 8 वाजता बोटी पाठवून या पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरवात झाली आहे.

जीवनज्योति, व्हाईट  आर्मी, अशा आपत्ती निवारण संघटना तसेच कोल्हापूर महानगरपालिका आपत्ती मदतकार्य पथक घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा... कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर पुराचे पाणी आणि मदतकार्याचे फोटो...