आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलिकॉप्टर लाचखोरी: आता सीव्हीसीमार्फत चौकशी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हेलिकॉप्टर लाचखोरीचे प्रकरण उघड झाल्यानंतर तपासात वेग येत असल्याचे दिसते. आता केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाकडे अहवाल मागितला आहे. प्रकरणाची थेट चौकशी करण्याचाही विचार यंत्रणा करू शकते. सीबीआय आणि संरक्षण मंत्रालय आधीपासून चौकशी करत आहे. कॅगदेखील अहवाल तयार करत आहे.

भारताने फिनमेकॅनिकाची सहकारी कंपनी ऑगस्टा वेस्टलँडकडून 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार 3,546 कोटी रुपयांत केला होता. सौद्यासाठी भारत आणि इटालीत 362 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप कंपनीवर आहे. आयोगाला याबाबत तक्रार मिळाली असल्याचे सीव्हीसीच्या अधिका-याने सांगितले. आयोगाने संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य दक्षता अधिका-याकडे अहवाल मागितला आहे.अहवालाला अंतिम रूप देणे किंवा आवश्यक कारवाईसाठी मंत्रालयाला चार महिन्यांचा अवधी मिळाला आहे. सध्याचे सीव्हीसी प्रदीपकुमार या सौद्यावरील स्वाक्षरीच्या वेळी संरक्षण सचिव होते. नियमित आधारावर या प्रकरणाची देखरेख करण्याचे निर्देश त्यांनी आपल्या अधिका-यांना दिल्याचे समजते.

कॅमेरून यांची मदत घेण्याची शक्यता
हेलिकॉप्टर लाचखोरी प्रकरणात चौकशीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याकडे मदत मागितली जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीवर लाच दिल्याचा आरोप आहे. कॅमेरून सोमवारी भारतात येत आहेत.
इटालीच्या वकिलाची मदत
प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय, संरक्षण मंत्रालयाचे तीनसदस्यीय पथक सोमवारी इटालीला जाणार आहे. सीबीआयचे दोन अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचा एक अधिकारी यात असेल. मंगळवारी पथक इटालीला जाईल.इटालीचा कायदा समजून घेण्यासाठी पथकाने तेथील वकिलाची मदत घेतली आहे.
टेट्रा ट्रकप्रकरणी ब्रिटन, हाँगकाँगकडे अहवाल मागितला
संरक्षणाशी संबंधित दुस-या एका टेट्रा ट्रक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपासाचा वेग वाढवला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात यंत्रणेने ब्रिटन आणि हाँगकाँगकडे अहवाल मागितला आहे. संचालनालयाने गतवर्षी एप्रिलमध्ये व्हेक्ट्राचे चेअरमन रवी ऋषी यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कंपनीची रचना, भारत आणि जगातील व्यापार, शेअर होल्डर्स याबाबत यंत्रणेला माहिती हवी आहे. उभय देशांतील या कंपनीच्या देवघेवीचा तपशीलही मागण्यात आला आहे.
हाश्क यांनी दस्तऐवज डिलीट केले
दलाल गोइडो हाश्क यांनी कॉम्प्युटरमधून प्रकरणाशी संबंधित फाइल्स डिलीट केल्या होत्या. इटालीच्या तपास पथकाने हार्ड डिस्कमधून त्या मिळवल्या आहेत. काही कागदपत्रे त्यांनी आईच्या घरात लपवले होते. तेदेखील मिळवण्यात आले आहेत.