आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलियम मूलद्रव्याच्या शोधामध्ये विजयदुर्गचाही वाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजी विद्यापीठाचे मानद शास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले यांच्याशी  चर्चा करताना चंद्रकांत परुळेकर. - Divya Marathi
शिवाजी विद्यापीठाचे मानद शास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले यांच्याशी चर्चा करताना चंद्रकांत परुळेकर.
कोल्हापूर - हवेपेक्षाही हलका असलेल्या हेलियम या मूलद्रव्याचा शोध १८ आॅगस्ट १८६८ मध्ये लागला. आज या शोधाला १४७ वर्षे पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे ज्या वेळी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे या मूलद्रव्याचा शोध लागला त्याचवेळी कोकणातील विजयदुर्ग किल्ल्यावरही याबाबतचे संशोधन सुरू होते. ही माहिती गेल्या काही वर्षांत पुढे आली असून यानिमित्त मंगळवारी विजयदुर्गवरही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्याला वास नाही, चव नाही आणि तो विषारी नसल्याने मानवी शरीराला अपायकारक नाही अशा या हेलियमचा शोध ज्या दिवशी लागला तो दिवस म्हणजेच १८ आॅगस्ट हा जागतिक हेलियम दिन म्हणून ओळखला जातो. १८६८ साली याच दिवशी खग्रास सूर्यग्रहण होते. त्यावेळी स्थिती, केंद्रबिंदू, अक्षांश, रेखांश याचा अभ्यास केल्यानंतर आणि पुरावे संकलित केल्यानंतर भारतामध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे या मूलद्रव्याचा शोध लागला हे सिद्ध झाले आहे.

मराठी विश्वकोशाचा खंड १६, प्र.के. घाणेकर यांनी लिहिलेले पर्वणी सूर्यग्रहणाची हे पुस्तक, ज्येष्ठ संशोधक मेघनाथ सहाय यांच्यावरील अनुवादित पुस्तकाचा रा. प्र. जयस्वाल यांनी केलेला अनुवाद याचा आढावा घेतल्यानंतर या सूर्यग्रहणाचा केंद्रबिंदू किल्ले विजयदुर्ग असल्याचे स्पष्ट झाले. हे सूर्यग्रहण भारतात मच्छलीपट्टणम, आंध्र प्रदेश, मिरज, सांगली, कोल्हापूर, विजयदुर्ग भागातून पूर्ण खग्रास दिसले होते. हा मार्ग निश्चित समजल्यानंतर खगोल अभ्यासक नार्मन लॅकियर हे विजयदुर्ग येथे आले. त्यांनी किल्ल्यावर दुर्बिणी ठेवण्यासाठी विशिष्ट आकाराचे कट्टे बांधून घेतले. आजही या कट्ट्यांना साहेबाचे ओटे असे म्हणतात. या दिवशी नागरिकांना दिवसातून दोनदा सूर्योदय पाहण्याचा योग आला. याचवेळी सूर्याच्या झाकलेल्या बिंबाशेजारी पिवळसर पट्टा दिसला जो त्याआधी कधी लक्षात आला नव्हता. गुंटूर येथेही जाॅन्सेन या खगोल शास्त्रज्ञाने याच पट्ट्याचा शोध लावला आणि पट्ट्याला हेलियम हे नाव देण्यात आले. यानंतर २७ वर्षांनी २८ मार्च १८९५ ला विल्यम रॅमसे यांनी पृथ्वीवर नार्वेमध्ये या मूलद्रव्याचे अस्तित्व असल्याचा शोध लावला. यानंतर तीन वर्षांनी जगभरातील खगोल शास्त्रज्ञ नागपूरजवळ एकत्र आले आणि त्यांनी पुन्हा या कड्याचा अभ्यास केला. यानंतर लॅकीयर पुन्हा विजयदुर्गवर आले आणि तेथील ग्रामस्थांना त्यांच्या गाव हे हेलियमचे माहेरघर असल्याची जाणीव करून दिली.
चंद्रकांत परुळेकरांचे योगदान
हेलियमचे माहेरघर विजयदुर्ग आहे तसेच साहेबाचे ओटे या संकल्पना ऐकून माहिती असल्या तरी त्या विस्मरणात गेल्या होत्या. मात्र मूळचे विजयदुर्गचे असलेले परंतु कोल्हापुरात वास्तव्यास असलेले चंद्रकांत परुळेकर यांनी विविध पुस्तके, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून ही माहिती पुन्हा उजेडात आणली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने १८ आगस्टला विजयदुर्गवर हेलियम डे साजरा करण्यास सुरुवात केली. यासाठी चंद्रकांत परुळेकर यांनी दुर्बिणीही तयार केल्या आहेत.