मुंबई - ‘लोकसभा आणि विधानसभेचे गणित अत्यंत वेगळे असते, विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे उमेदवार केंद्रित असते. उमेदवाराने
आपल्या मतदारसंघात काय काम केले आहे, त्याचा प्रभाव किती आहे यावर त्याचा जय-पराजय ठरलेला असतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे चित्र दिसते तेच विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही,’ असा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
सांगलीतील भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी आबांना ‘विधानसभेत जिंकून दाखवा’ असे आव्हान दिले आहे. या बाबत आर.आर. म्हणाले, संजयकाकांना मोदी लाटेमुळे विजय मिळाला आहे. परंतु आता मोदी लाट ओसरली आहे. त्यांनी मला आव्हान का दिले तेच समजत नाही. मात्र मी त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. लोकसभेचे आणि विधानसभेचे गणित वेगळे असते हे त्यांना ठाऊक नाही. लोकसभेला उमेदवाराची पत २५ टक्के आणि पक्षाची पत ७५ टक्के असते तर विधानसभेला हीच टक्केवारी ५०-५० टक्के असते आणि नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत हेच प्रमाण ७५-२५ टक्के असते. विधानसभा निवडणुकीत मतदार आपल्या उमेदवाराला मत देतात. उमेदवाराने आपल्यासाठी काय आणि किती काम केले आहे याचा विचार करून मत दिले जाते. त्यामुळेच अपक्ष विजयी उमेदवारांची संख्या जास्त झालेली आपल्याला दिसून येते. माझ्या मतदारसंघात मी किती आणि काय काम केले आहे ते मतदारांना ठाऊक आहे. त्यामुळे मी जिंकून येईन यात शंका नाही.
‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी होणारच आहे. जागा वाटपाबाबत दिल्लीस्तरावर चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल,’ असेही आबांनी स्पष्ट केले.