आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Horse Tied Before Kolhapur Municipal Corporation

शिवी देणा-या अधिका-यासाठी कोल्हापूर महापालिकेसमोर बांधला घोडा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कागदपत्रे जमा करूनही काम न केल्याने एका नागरिकाने महापालिकेतील अधिका-याला जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तर न देता उलट अधिका-याने संबंधिताला घोड्याचे नाव घेऊन शिवीगाळ केली. ती जिव्हारी लागल्याने त्या नागरिकाने चक्क कार्यालयाबाहेर घोडाच आणून उभा केला. त्यामुळे संबंधित अधिका-याने पळ काढला. बुधवारी कोल्हापुरात ही घटना घडली.


महापालिकेचा शहर उपअभियंता आधीच वेगवेगळ्या कारणासाठी ‘प्रसिद्ध’ आहे. कामे रखडवत ठेवत नागरिकांना पालिकेचे उंबरठे झिजवायला लावण्यात त्याचा हातखंडा आहे. बुधवारी दुपारी एक नागरिक कामानिमित्त या अभियंत्याकडे गेला. मात्र आणखी कागदपत्रे आणा, असे फर्मान अभियंत्याने सोडले. ‘आधीच इतकी कागदपत्रे दिली, तरीही काम कसे होत नाही?’ असा सवाल नागरिकाने विचारला. त्यामुळे उभयतांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. आपण कार्यालयात असल्याचे भान विसरलेल्या अभियंत्याने संबंधित नागरिकास शिवीगाळ केली. घोड्याचे नाव घेऊन अश्लील शब्दही वापरले.


सर्वांदेखत झालेला हा अपमान जिव्हारी लागल्याने संबंधित नागरिकाने अभियंत्याला अद्दल घडविण्याचा निश्चय केला. सायंकाळच्या सुमारास त्याने भाड्याने घोडा आणला व महापालिकेच्या दाराबाहेर उभा केला. ‘मीच घोडा आणलाय, खाली या’ असा निरोपही त्याने अभियंत्याला पाठविला.


या घटनेची माहिती कळताच कार्यालयातील बहुतांश कर्मचारी घोडा पाहण्यासाठी बाहेर आले. कार्यालयात एकच चर्चा सुरू झाली. ही बातमी संबंधित अभियंत्यापर्यंत पोहोचल्यावर मात्र त्याची पाचावर धारण बसली आणि मागच्या दाराने त्याने पळ काढला. या प्रकाराची दिवसभर मनपा परिसर व शहरात चर्चा होती.