सांगली - रंगभूमीवर चारित्र्य सांभाळत नवनवे प्रयोग करत राहणे अवघड असते; मात्र हे काम अनेक नाट्यकर्मी आजही अविरतपणे करत आहेत, ही मोठी गोष्ट असल्याचे प्रतिपादन नाट्यदिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी बुधवारी सांगलीत केले.
अखिल भारतीय नाट्यविद्या परिषदेच्या वतीने देण्यात येणारे विष्णुदास भावे गौरव पदक नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आले. या वेळी स्थानिक कलाकार म्हणून डॉ. दयानंद नाईक व शफी नायकवडी यांचा सन्मान करण्यात आला. नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांनी डॉ. पटेल यांची प्रकट मुलाखतही घेतली.
डॉ. पटेल म्हणाले, ‘१९८५ पासून मी रंगभूमीवर काही केले नाही. त्यामुळे मला हा पुरस्कार नको, असे संयोजकांना मी सांगितले होते; मात्र त्यांनी ‘तुमचेच नाव निश्चित केले आहे,’ असे मला कळवले. त्यामुळे मला आज इथे यावे लागले. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले बालगंधर्व, केशवराव दाते, डॉ. श्रीराम लागू अशी मंडळी माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. त्यांना मिळालेला पुरस्कार मला मिळतोय, हीच माझ्यासाठी विलक्षण गोष्ट आहे. याचे माझ्यावर दडपणही आले आहे.
ज्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतोय, ते विष्णुदास भावे यांनी
आपल्या नाटकातून आणि कृतीतून समाजाला आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ विचार दिला. त्यांनी आपल्या नाटकांतून समाजाला डोळसपणा दिला. पारंपरिक शिक्षण किती टाकाऊ आहे, हे त्यांनी एकोणिसाव्या शतकात घरदार, शाळा सोडून नाटकाला
स्वत:ला वाहून घेऊन सिद्ध करून दाखवले,’ याकडेही डॉ. पटेल यांनी सर्वांचे लक्ष वेधले.