आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Don't Bear Maharashtra Defame, Sharad Pawar Warned Modi

महाराष्ट्राची बदनामी खपवून घेणार नाही, शरद पवारांनी मोदींना ठणकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - भाजपने निवडणूक जाहिरातींतून महाराष्ट्राची बदनामी सुरू केली आहे. हे गुंडांचे राज्य आहे अशी प्रतिमा तयार केली आहे. महाराष्ट्राची बदनामी येथील जनता कदापि खपवून घेणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठणकावले.

राष्ट्रवादीच्या खानापूर, जत येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्र पुरोगामी विचार व समतेचा संदेश देणारे राज्य आहे. मोदी देशाचे पंतप्रधान झाले; पण ते गुजरातच्या बाहेरच पडले नाहीत. भाजप सरकारची नीती ही सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे. भाजप सरकारने सत्तेवर आल्यापासून शेतकरीविरोधी धोरणे राबवली आहेत. शेतीची अनुदाने बंद केली, शेतमालाच्या निर्यातीवर बंदी आणली. त्याचा फटका त्यांना उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील पोटनिवडणुकांत बसला आहे. महाराष्ट्राची जनताही भाजपला धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरतेचा वचपा काढत आहेत
जयंत पाटील म्हणाले, आर.आर.पाटील यांचे महत्त्व एवढे वाढले आहे, की त्यांच्या मतदारसंघात देशाच्या पंतप्रधानाला सभा घ्यावी लागते. पण आबांचा पराभव करणे एवढे सोपे नाही. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, याचा वचपा मोदी महाराष्ट्रावर अन्याय करून काढत आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

मोदींनी पदाची प्रतिष्ठा जपावी
लोकसभेच्या वेळी लाट होती. भाजपचे सरकार आले. आता तशी परिस्थिती नाही. तरीही मोदींना प्रचारासाठी बोलावण्याची वेळ भाजपवर आली आहे. पंतप्रधानपदाला वेगळी प्रतिष्ठा असते. त्याकडे दुर्लक्ष करून राज्यात मोदींच्या सभा होत आहेत. मोदीही सर्व कामे सोडून प्रचाराला येत आहेत. त्यांनी पदाची प्रतिष्ठा जपावी, असा सल्ला पवारांनी तुळजापूर येथील सभेत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जीवन गोरे यांच्या प्रचारार्थ पवारांची सभा झाली. लोकसभेत लोकांना बदल हवा होता. आम्ही तो कौल स्वीकारला. पण विधानसभेची निवडणूक वेगळी आहे, असेही पवार म्हणाले.