आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Abortion News In Marathi, Sushma Patil, Arjun, Divya Marathi

बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉक्टर दांपत्यावर गुन्हा, १०७ गर्भपात केल्याने सांगलीत खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - बेकायदेशीर रीत्या१०७ गर्भपात केल्याप्रकरणी येथील डॉ. सुषमा आणि अर्जुन पाटील या दांपत्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. यामध्ये स्त्री भ्रूणहत्येचा संशय असून महापालिकेचा आरोग्य विभाग त्यादृष्टीने चौकशी करत आहे.

सांगलीतील आंबेडकर रस्त्यावर डॉ. सुषमा पाटील यांचे श्री मॅटर्निटी हॉस्पिटल आहे. येथे वैद्यकीय कारणांसाठी गर्भपात करण्याचे अधिकृत केंद्र आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. सचनि पाटील यांची नियुक्ती केली आहे. येथे होत असलेल्या गर्भपात शस्त्रक्रियांची नोंद ठेवून महापालिकेला वेळोवेळी माहिती देणे आवश्यक होते; मात्र डॉ. सुषमा पाटील यांनी तसे केले नाही. त्यामुळे ऑगस्टला महापालिकेने शस्त्रक्रियांसंबंधी कागदपत्रे ताब्यात घेतली असता १०७ शस्त्रक्रिया बेकायदेशीर केल्याचे उघडकीस आले.

या शस्त्रक्रिया डॉ. सचनि पाटील यांच्या परस्पर झाल्या आहेत. त्यांची या हॉिस्पटलमध्ये ऑनकॉल शल्यचिकित्सक म्हणून २०११ मध्ये नेमणूक झाल्यापासून एकदाही त्यांना येथे शस्त्रक्रियेसाठी बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यातच आपली नेमणूक रद्द करावी, असे निवेदन महापालिकेला दिले होते.

तपासणीत गर्भपात झालेल्या शस्त्रक्रियांच्या अहवालांवर डॉ. सचनि पाटील यांच्या सह्याही नसल्याचे उघड झाले आहे. या शस्त्रक्रिया अर्जुन पाटील आणि त्यांचे सहकारी डॉक्टर संतोष पाटील हेच करत असल्याची कबुलीही अर्जुन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येच्या हेतूनेच हे गर्भपात झाल्याचा संशय महापालिकेला आहे. आरोग्याधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांच्या आदेशाने सहायक वैद्यकीय अधिकारी विजय ऐनापुरे यांनी या डॉक्टर दांपत्यावर गुन्हा दाखल केला आहे.