कोल्हापूर- दुर्मिळ असणाऱ्या देश- विदेशातील वनस्पतींच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरणारे देशातील पहिले लीड बोटॅनिकल गार्डन (जैवविविधता पार्क) शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाकडून साकारण्यात आले आहे. हे गार्डन शुक्रवारपासून खुले केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन उद्या सकाळी 11 वाजता केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. परमजित सिंग, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. या उद्यानाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने 'देशातील पहिले लीड बॉटनिकल गार्डन' म्हणून सन 2007 मध्ये घोषित केले होते. आता या गार्डनच्या माध्यमातून पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती, प्रजातींचे संवर्धन आणि या वनस्पतींचे नवीन उपयोगांबाबतचे संशोधन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींबाबत शिक्षण तसेच वनस्पतींच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये प्रबोधन केले जाईल. गार्डनमध्ये सपुष्प, नेचेवर्गीय, पाम, आदी स्वरूपातील सुमारे 1133 वनस्पती आहेत. जगभरातील अनेक देशातील संशोधक कोल्हापूरात दाखल झाले असून या प्रकल्पासाठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आले आहेत.