आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन परिषद: जलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करा; डॉ. चितळेंचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- संयुक्त राष्ट्रसंघाने यंदा आंतरराष्ट्रीय जलवर्षानिमित्त पाणी संवर्धनातील सामूहिक समभागितेवर जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणण्याचे ठरवले आहे. आपल्यालाही यापुढील काळात पाण्याचे सामूहिक संवर्धन करण्यासाठी एकत्रित कार्यक्रम राबवण्याची गरज आहे, असे मत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी शनिवारी व्यक्त केले. अमेरिकेलाही दुष्काळाच्या झळा बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
जालीहाळ (जि. सांगली) येथे आयोजित 14 व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. चितळे म्हणाले, ‘आपल्या देशात ज्याप्रमाणे दुष्काळाचे चटके बसत आहेत त्याप्रमाणेच अमेरिकेतील 50 पैकी 30 राज्यांना या वर्षी दुष्काळाचा फटका बसला आहे. त्यामुळे केवळ आपणच दुष्काळाचा सामना करत आहोत असे समजण्याचे कारण नाही. जागतिकीकरणामुळे आपल्याचा यासंदर्भातून काही बोध घेता
आला तर तो घ्यावा.


संयुक्त राष्टÑ संघ करणार सामूहिक विचारमंथन

ठोस उपायांची गरज
यंदाच्या जलदिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघाने सामूहिक जलसंवर्धनावर विचारमंथन घडवून आणण्याचे ठरवले आहे. 22 मार्चला आपणसुद्धा आपल्या भागात जलसंवर्धनातील सहभागिता कशी वाढवता येईल यावर चर्चा करावी. पाणी संवर्धनासाठी एका व्यक्तीने काम करून चालणार नाही. त्यासाठी सामूहिक उपाय, कार्यक्रम राबवावे लागणार आहेत. आपल्या भवितव्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरणार आहे, असेही डॉ. चितळे म्हणाले.

विज्ञानाची कास धरा
‘यापुढे शेतकर्‍यांची प्रगती ही केवळ कष्टावर होणार नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्न तर करावे लागतीलच, शिवाय विज्ञानाचाही आधार घ्यावा लागेल. प्रगत देश आणि आपल्यामध्ये नेमकी हीच दरी जाणवते. शेतीचे, पाण्याचे विज्ञान आपल्या शेतकर्‍यापर्यंत पोहोचले नाही. हे पोहोचवण्यासाठी दुवा म्हणून आपल्या तरुणांना काम करायचे आहे,’ असे डॉ. चितळे म्हणाले.

चीनमधील कृषी तंत्रज्ञान विकसित
डॉ. चितळे म्हणाले, ‘भारत आणि चीनची तुलना केली तर पाण्याच्या काटकसरीत चीन आपल्या पुढेच आहे. महाराष्ट्रातील दोन शेतकर्‍यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंचनाच्या बाबतीत पुरस्कार मिळवले आहेत. मात्र, त्यांचे प्रयोग अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडतो. याउलट हाच पुरस्कार मिळालेल्या एका चिनी प्राध्यापकाने पाण्याचा कमीत कमी वापर करून शेतीची उत्पादकता कशी वाढवता येईल, याचे तंत्रज्ञान विकसित केले आणि ते त्यांच्या देशातील शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले. याचा परिणाम असा झाला की सिंचन सहयोगप्रमाणे जागतिक स्तरावर काम करणार्‍या संघटनेचे अध्यक्षपद या प्राध्यापकाला मिळाले. आपल्या शेतकर्‍यांनीही असेच आपले ज्ञान वाटावे आणि जागतिक संघटनेचे नेतृत्व करायला हवे.’