आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Its Wrong To Be Politise Afzal Guru\'s Hanging Raj Thakare

सध्या मी गालावर टाळी वाजवतो; उद्धवदादूच्‍या हाकेला राज ठाकरेंची बगल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘अतिरेकी अफझल गुरूला उशिरा का होईना फाशी दिली हे चांगलंच झालं. पण आता या विषयावर राजकारण करणे चुकीचे आहे. निवडणुकांसाठी ही मंडळी वर्षअखेरीस कारगिलसारखे एखादे छोटेसे युद्धही करतील,’ असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केंद्रातील
‘यूपीए’ सरकारला लगावला.

राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात कसबा पेठ गणपतीचे दर्शन घेऊन राज्यव्यापी दौ-याचा शुभारंभ केला. रविवारी त्यांनी साता-या तील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, अफझल गुरू संसदेवर हल्ला करतो, त्याला फाशीची शिक्षा होते. नंतर माफीचा अर्ज दाखल केला जातो आणि सुमारे अकरा वर्षांनंतर त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी होते. यात राजकारण करण्यासारखे काय आहे? ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आठ-दहा राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठी हे प्रकार केले जात असतील तर ते अयोग्यच आहेत.

हा तर भंपकपणा
पाकिस्तानमध्ये अशांतता होती तेव्हा भारतीय सैनिकांची हत्या करून अशांतता निर्माण करण्यात आली. कळीचे मुद्दे निर्माण झाले की, भारत-पाक संघर्ष किंवा कोणाला तरी फासावर द्यायचे हा प्रकार होताना दिसतो. हा सगळा भंपकपणा आहे. युद्धजन्य परिस्थिती असल्याचे सांगून सगळ्यांना एकत्र आणायचे आणि दुसरीकडे लक्ष वळवायचे, या प्रकाराला काही अर्थ नसल्याचे राज म्हणाले.

गालावर वाजवतो टाळी
‘शिवसेना-मनसे एकत्र येणार का?’ या बहुचर्चित मुद्द्यावर उत्तर देण्याचे राज ठाकरे यांनी आजही टाळले. ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता ‘दुसरे काही प्रश्न नाहीत का?’ असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. तसेच ‘सध्या मी गालावर टाळी वाजवण्याचे काम करतो आहे,’ असे सांगून राज ठाकरे यांनी अधिक बोलणे टाळले.
मनसे हा ग्रामीण पक्ष
मनसे हा ग्रामीण भागात वाढणारा पक्ष. परंतु प्रसार माध्यमे आमचा पक्ष केवळ शहरी असल्याचे सांगतात. या दौ-यात आपण ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनाही सूचना देत आहोत, त्याचे परिणाम लवकरच दिसतील. पुढील महिन्यात पक्षाचा सातवा वर्धापन दिन आहे. आजवरच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. पहिल्याच निवडणुकीत आमचे 13 आमदार निवडून आले. काही महापालिकांतही सदस्य आहेत. इतर जुन्या पक्षांच्या तुलनेत ही बाब महत्त्वाची असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले.

अपेक्षा पूर्ण होत नाहीत
प्रत्येक गावात शाखा आहेत, पक्ष वाढत आहे, त्याचीच बांधणी मी करतो आहे. आज जी भयावह परिस्थिती निर्माण झालीय ती खूप दिवसांपासून आहे. ती परिस्थिती मनसेने बदलावी, अशी माझी अपेक्षा आहे. पण माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. वाईट स्थिती निर्माण करणारे पुन्हा का निवडून येतात ? परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करतो ? केवळ वरवर बोलून, तक्रार करून चालणार नाही. त्यासाठी मी प्रयत्न करतोय. पदाधिकारी नेत्यांच्या बैठका घेतोय.

हा दुष्काळ दौरा नाही
पश्चिम महाराष्ट्रासंदर्भात पक्षाचे धोरण ठरले आहे याबाबत मी कोल्हापूरच्या सभेत बोलेन. दुष्काळी भागातील दौ-यांबाबत आताच नियोजन नाही, याकडे नंतर लक्ष देणार आहे. साता-या ची बरीच मंडळी माझ्या संपर्कात आहेत, पण मी त्यांना वेळ दिली नाही. कारण माझे कार्यकर्ते त्यांच्याशीच लढत आहेत याची मला जाणीव आहे.