आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानडी सरकारच्या ‘महाराष्ट्रद्वेषी’ भूमिकेला चाेख प्रत्युत्तर, मंत्री बेग भूमिकेवर कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - ‘यापुढे सीमा भागातील नगरसेवक अथवा अामदारांनी ‘जय महाराष्ट्र’ अशा घाेषणा दिल्यास या लाेकप्रतिनिधींचे पदच रद्द करण्याचा इशारा कर्नाटकचे नगरविकास मंत्री राेशन बेग यांनी दिला हाेता. त्यांच्या या वक्तव्याचे सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.
 
कानडी सरकारच्या या मराठीद्वेष्ट्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात अालेल्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर ठळक अक्षरात ‘जय महाराष्ट्र’ लिहून या बस कर्नाटक राज्यात रवाना केल्या. दादर येथील कर्नाटक संघ या संस्थेच्या फलकाला स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. काेल्हापुरातही शिवसैनिकांनी कर्नाटकच्या ‘जय महाराष्ट्र’ ही अक्षरे ठळकपणे रंगवली.

मंत्री बेग भूमिकेवर कायम
महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाही  मंत्री रोशन बेग आपल्या मतावर ठाम अाहेत. अशा लाेकप्रतिनिधींवर कारवाईसाठी कर्नाटक सरकार लवकरच विधेयक अाणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘अापण सगळे भारतीय आहोत म्हणून तोंडाला येईल ते कुठल्याही राज्याच्या विरोधात घोषणा देणे योग्य नव्हे.  अाता कुणीही कर्नाटकविरोधी उदगार  काढल्यास त्याचं पद रद्द करणार आहोत,’ असा पुनरुच्चारही त्यांनी केला. दरम्यान, ‘कर्नाटकच्या बसेसवर असे फलक लिहू नका’ अशी विनंती अापण महाराष्ट्र सरकारला करणार असल्याचेही बेग म्हणाले.

बेग यांनी बेकायदा कृती केल्यास कारवाई : पाटील
‘महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न वाद न्यायालयात प्रलंबित असून त्याविषयी कोणीही भाष्य करु नये. कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांनी केलेले वक्तव्य असंवैधानिक असून त्यामुळे भारतीय संविधानाच्या तरतुदींचा भंग होत आहे. जर जबाबदार मंत्र्यांकडून निरर्थक, बेकायदेशीर कृती झाली तर उचित कायदेशीर कार्यवाही करावी लागेल,’ असा इशारा  महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी दिला. दोन्ही राज्ये ही समस्या न्यायिक रितीने हाताळून राष्ट्र हिताकडे लक्ष देतील, असेही ते म्हणाले.

‘कर्नाटक सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यानी असे विधान करणे अत्यंत चूकीचे आहे. सीमा वादाबाबत महाराष्ट्र राज्याचा समन्वयक मंत्री म्हणून मी या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन बेग यांच्या या असंवैधानिक कृतीकडे लक्ष वेधत आहे,’ असेही पाटील म्हणाले. ‘आपण या देशाचे नागरिक असून हा देश विविध प्रकारची संस्कृती व विविधतेत एकता यासाठी ओळखला जातो. अशा विधानामुळे जनक्षोभ उसळून सीमा भागात शांतता व ऐक्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि भारताच्या संविधानाच्या तरतुदींचा तो भंगच म्हणावा लागेल. कर्नाटक सरकारने याबाबींकडे गांभीर्याने लक्ष घालून शांतता व सलोखा यास बाधा पोहोचेल अशी काेणतीही कृती करु नये,’ असेही पाटील यांनी सुनावले.
 
बातम्या आणखी आहेत...