कोल्हापूर- कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओचा ‘हेरिटेज’ दर्जा कायम राहणार आहे. लता मंगेशकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या हेरिटेजला विरोध करत सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली होती. त्यामुळे स्टुडिओ हेरिटेजच राहणार आहे.
हायकोर्टाने फेटाळली होती लता मंगेशकर यांची याचिका
जयप्रभा स्टुडिओला कोणत्या अधिकारात हेरिटेज घोषित करण्यात आले, असा सवाल करत लता मंगेशकरांनी राज्य सरकारविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने लता मंगेशकरांची याचिका फेटाळली. त्यानंतर लता मंगेशकरांच्या वकिलांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
चार वर्षांनंतर वाद संपुष्टात
आता सुप्रीम कोर्टातून लता मंगेशकरांनी याचिका मागे घेत माघार घेतल्याने जयप्रभा स्टुडिओ हेरिटेजच राहणार आहे. शिवाय, जवळपास चार वर्षांनंतर जयप्रभा स्टुडिओचा न्यायालयीन वाद संपुष्टात आला आहे.
कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजाराम महाराज यांनी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी 1934 मध्ये जयप्रभा स्टुडिओ उभारला. त्यानंतर 1944 मध्ये भालजी पेंढारकर यांनी हा स्टुडिओ महाराजांकडून विकत घेतला होता. त्यानंतर पेंढारकरांनी सुमारे 50 वर्षांनी हा स्टुडिओ लता मंगेशकर यांना विकला.