आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपंचायतीविरोधात साताऱ्यात यशस्वी लढा, अंनिसचीही साथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - पश्चिम महाराष्ट्रात जातपंचायतीची पाळेमुळे अजूनही घट्ट आहेत. किरकोळ कारणावरूनही एखाद्याला बहिष्कृत करण्याचे, कठोर दंड ठोठावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील उंब्रजजवळील पेर्ले (ता. कराड) या गावातील विकास चव्हाण या युवकाने जातपंचायतीच्या निर्णयाविरोधात लढण्याचे धाडस दाखवले. अंनिसनेही त्यांना साथ दिली. या लढ्याला यश आले असून आता विकास यांना दंड ठोठावण्याचा निर्णय जातपंचायतीला मागे घ्यावा लागला.

अंनिसचे राज्य सरचिरटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी या लढ्याविषयी माहिती दिली. पेर्ले गावाजवळ राहत असलेल्या गोपाळ समाजातील विकास चव्हाण यांना कौटुंबिक वादातून जातपंचायतीस समोर जावे लागले. त्यावर या वादातून बाहेर पडण्यासाठी जातपंचायतीने त्यांना आर्थिक दंड ठोठावला तसेच जातीतून बहिष्कृत करण्याची शिक्षाही दिली. या अन्यायकारक कारवाईविरोधात विकास यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनाही माहिती दिली. त्याची दखल घेत साताऱ्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जातपंचायतचे सदस्य, चव्हाण कुटुंबीयांची बैठक झाली. या वेळी अंनिसचे पदाधिकारी प्रशांत सरपोतदारही उपस्थित होते.

जातपंचायत हे घटनाबाह्य केंद्र असून बहिष्कृत करण्याबाबतची त्यांची कृती बेकायदेशीर आहे, हे पोलिस अधीक्षकांनी पंचांना समजावून सांगितले. त्यावर पंचांनीही जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘गोपाळ समाज असलेल्या इतर भागातील पंचांनादेखील या अनिष्ट प्रथेपासून थांबवण्याचा प्रयत्न करू. यापुढे समाजसुधारणा करण्यासाठी काम करू, कोणालाही दंड करणार नाही, वाळीत टाकणार नाही,’ असे पंचांनी जाहीर केले.
प्रस्तावित कायदा मंजूर करा : हमीद दाभोलकर
सातारा जिल्ह्यात विकास चव्हाण यांच्या लढ्यामुळे जातपंचायतीने कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील गोंधळी समाजातील कुटुंबीयांना मात्र जातपंचायतीच्या अघोरी बहिष्कारामुळे गाव सोडावे लागले. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या नाशिकमधील लोकांनाही जातपंचायतीने बहिष्कृत केले आहे. अशा घटनांमुळे अजूनही राज्यातील काही समाजात जातपंचायतीची दहशत कायम आहे. ही दहशत नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने जात पंचायतीविरोधातील प्रस्तावित कायदा लवकरात लवकर मंजूर करावा तसेच इतर समाजातील तरुणांनी धाडस दाखवून जात पंचायतीस मूठमाती द्यावी,
असे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.