आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jotiba Tempal's Sunder Elephant PETA News In Marathi

सुंदर हत्तीला बंगळुरूला पाठवा, वन खात्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - जोतिबा देवस्थानसाठी दिलेल्या सुंदर हत्तीला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवण्याच्या महाराष्ट्र वन विभागाच्या आदेशावर उच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. या आदेशाला स्थगिती देण्याची भाविकांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. सुंदर हत्तीची व्यवस्थित देखभाल होत नसल्याबाबत पेटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तर सुंदरला न हलवण्याबाबत विनय कोरे यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा उद्योग समूहाचे नेते व आमदार विनय कोरे यांनी जोतिबा देवस्थानला 2007 मध्ये सुंदर भेट दिला होता. सुंदरचे वास्तव्य काही वर्षे जोतिबावरच होते. परंतु तेथे तो चिडचिडा बनू लागल्याने त्याला हलवण्याबाबत चर्चा सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी जोतिबा यात्रेच्या कालावधीत चिडलेल्या सुंदरने आपला राग व्यक्त केला होता.
यानंतर सुंदरची नीट देखभाल होत नसल्याचे सांगली येथील प्राणिमित्र संस्थेने उघडकीस आणले होते. त्यानंतर पेटाने सुंदरची मुक्तता करावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली. 21 आॅगस्ट 2012 रोजी वन विभागाने सुंदरला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित करण्याचा आदेश दिला होता. मात्र, सुंदरला वारणानगर येथील एका शेडमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, पेटाने गुप्तपणे केलेल्या चित्रीकरणामध्ये माहुताकडून सुंदरला मारहाण होत असल्याचे उघड झाले होते. ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर जगभरातून पेटाच्या मोहिमेला पाठिंबा मिळू लागला. त्यानंतर पुन्हा सुनावणी होऊ न अखेर वन खात्याने दिलेल्या आदेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. 21 महिने पेटाने हे प्रकरण लावून धरले होते.
बिग बींचा पाठिंबा, माधुरीचे कोरेंना पत्र
पेटाच्या या मोहिमेला जगभरातून प्रतिसाद मिळाला. महानायक अमिताभ बच्च्न, माधुरी दीक्षित, पामेला अँडरसन, अर्जुन रामपाल, आर. माधवन, गुलशन ग्रोव्हर यांनी दखल घेत सुंदरच्या मुक्ततेची मागणी केली होती. हत्तीला आपण गजराज म्हणजेच देव मानतो आणि देवाला साखळ्यांनी बांधून ठेवतात का, अशी विचारणा माधुरी दीक्षितने विनय कोरे यांना पत्र लिहून केली होती.
जोतिबा देवस्थानने केले परत सुंदरचे दान
सुंदर हत्तीबाबत मतमतांतरे सुरू झाल्यानंतर आणि जोतिबा देवस्थानकडून सुंदरची देखभाल करणे शक्य नसल्याने दोनच महिन्यांपूर्वी सुंदरला ज्यांनी दान दिले त्या वारणा उद्योग समूहाला परत देण्यात आले. त्यामुळे एकीकडे न्यायालयाने सुंदरला हलवण्याबाबत जोतिबा देवस्थानला आदेश दिला आहे, तर दुसरीकडे आता सुंदर हा वारणा उद्योग समूहाच्या ताब्यात आहे.