सांगली - चांदोली राष्ट्रीय उद्यानातील गैरकारभाराची सचिवालयात माहिती दिली आहे. त्याबाबतची बातमी प्रसिद्ध न करण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी करणा-या एका पत्रकारासह शिवसेना कार्यकर्त्याला अटक करण्यात आली.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक विकासकामे झाली. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून त्याची तक्रार सचिवालयात केल्याचे सांगून शिवसेना कार्यकर्ता विकास वसंत माने व पत्रकार बिपिन आदिनाथ पाटील हे दोघे वनक्षेत्रपाल भारत माने यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. त्यांच्या मागणीला माने यांनी विरोध केला होता, तरीही सचिवालयात तक्रार दिल्याचे सांगून व त्याची वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन हे दोघे पैशांची मागणी करत होते. त्याबाबतची तक्रार माने यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दोन दिवसांपूर्वी विकास व बिपिन या दोघांनी वनक्षेत्रपाल कार्यालयात जाऊन ३० लाख रुपयांची खंडणी मागितली, त्याच वेळी माने यांनी या संवादाची व्हिडिओ क्लिप तयार केली आणि ती पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिसांनी बिपिन व विकास यांना मंगळवारी अटक केली. या दोघांनाही शिराळा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठाेठावली आहे.