आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karantak Maharashtra Border Issue Latest Marathi News

घराघरांवर ‘महाराष्ट्र’! कानडी पोलिसांच्या निषेधार्थ बेळगाव, निपाणीत बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - सीमेवरील येळ्ळुरातील ग्रामस्थांना रविवारी कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी बेळगाव, निपाणी परिसरातील ग्रामीण भागात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केवळ बेळगावातील व्यवहार सुरू ठेवण्यात आले होते. येळ्ळूरचा एक फलक दोन वेळा उद्ध्वस्त करणार्‍या कर्नाटक सरकारच्या नाकावर टिच्चून सीमाभागातील मराठी लोकांनी घराघरावर ‘महाराष्ट्र राज्या’चे फलक झळकावले.
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर पूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, रमजानचा सण लक्षात घेऊन दुपारी 4 नंतर बाजारपेठ सुरू करण्यात आली. येळ्ळूर येथे अमानुष अत्याचार केल्यानंतर सात जणांना पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी येथील घरात घुसून मारहाण करून ज्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती त्यांनी सोमवारी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यापैकी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर नंतर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कर्नाटक बसेस बंद
कर्नाटकच्या बसगाड्यांवर शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. शुक्रवारी कोल्हापूर स्थानकावर उभारलेल्या सहा गाड्या फोडण्यात आल्या, तर रविवारी कागल राष्ट्रीय महामार्गावरही काही गाड्या फोडण्यात आल्या. त्यामुळे बेळगावहून महाराष्ट्रात येणार्‍या कर्नाटक परिवहन महामंडळ बसच्या सुमारे 200 फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सीमाप्रश्नी नव्याने न्यायिक लढा उभारण्याचा निर्णय सोमवारी सांगलीतील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बुधवारी कानडी पोलिसांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

आमचे सरकार असल्याने संयम बाळगतोय : शिवसेना
कर्नाटकमध्ये खाकी वर्दीतील गुंडांचा आतंक सुरू आहे. केंद्रात आमचे सरकार असल्याने त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही संयम बाळगत आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. येळ्ळूर पाकिस्तानात नसून भारतात आहे, हे कर्नाटक सरकार विसरत आहे. मुंबईतही कानडी लोकांच्या अनेक संस्था, हॉटेल्स आहेत. एक ठिणगी पडली तर प्रकरण भयंकर होईल. संसदेत आम्ही हे प्रकरण उचलणार असून राज्यातील सर्व खासदारांनी आम्हाला साथ द्यावी. हा विवादित भाग केंद्रशासित करावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.
केंद्रीय मानवी हक्क आयोगाला तावडेंचे पत्र
कर्नाटक पोलिसांनी सीमा भागातील मराठी माणसांवर ज्या पद्धतीने अत्याचार केला त्यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे. हा अमानुष प्रकार करताना कर्नाटक पोलिसांनी सर्व कायदे आणि नियम पायदळी तुडवले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते विनोद तावडे यांनी केंद्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. के. जी. बालकृष्णन यांना पाठवले आहे.
बेळगावजवळील बाची या गावातही सोमवारी कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. तसेच गावात ‘महाराष्ट्र राज्य’ असा फलक उभारून त्यावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. पोलिसांनी जरी हा फलक काढला तरी पुन्हा उभारण्याचा इशाराही या गावातील तरुण मंडळांनी दिला आहे. याच पद्धतीने या पुढच्या काळात गावागावात ‘महाराष्ट्र राज्या’चे फलक उभारण्यात येणार आहेत.
बाची येथे उभारला फलक
कर्नाटक पोलिसांनी मराठी बांधवांवर केलेल्या अमानुष अत्याचाराचा मुंबईतील डबेवाल्यांनीही सोमवारी तीव्र शब्दांत निषेध केला. परळ रेल्वेस्थानकावर त्यांनी कानडी पोलिसांच्या निषेधार्थ फलक झळकावले.