आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karnataka Bus News In Marathi, Yallur Maharashtra Board

महाराष्ट्राचा स्तंभ कन्नडिगांनी उखडला; कर्नाटकच्या सहा बसगाड्या फोडल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कर्नाटकातील यळळूर गावच्या वेशीवर ‘महाराष्ट्र राज्य यळळूर’ असा मजकूर लिहिलेला पक्क्या बांधकामातील स्तंभ कर्नाटक पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सकाळी उद्ध्वस्त करण्यात आला. त्यामुळे सीमा भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. कोल्हापुरात शिवसैनिकांनी कर्नाटक परिवहन विभागाच्या सहा बसगाड्यांची तोडफोड करून संताप व्यक्त केला. तर सीमाभागात गावागोवी ‘महाराष्ट्र राज्य’ असे फलक उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

यळळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य’ लिहिलेला हा स्तंभ काढण्यासाठी कर्नाटक शासन गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. परंतु सीमावासीयांनी त्या शासनाच्या कोणत्याही आदेशाला दाद दिली नव्हती. अखेर एका कर्नाटकी नेत्याने याचिका दाखल करून, न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत कर्नाटक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी हे पक्के बांधकाम उद्ध्वस्त केले. ही माहिती मिळताच शेकडो कार्यकर्त्यांनी यळळूरकडे धाव घेतली. आमदार संभाजी पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे टी.के. पाटील, बेळगावच्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर शिवाजी सूंठकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आता महाराष्ट्राचे फलक सीमाभागातील गावागावात लावण्याचा निर्धार व्यक्त करतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णही घेण्यात आला. दरम्यान, एकूणच कर्नाटकाच्या सीमभागात आता या विषयावर वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

मग मराठीतून परिपत्रके का नाहीत
एकीकडे न्यायालयाचा आदेश म्हणून हा स्तंभ उखडण्यात आला. परंतु सीमाभागातील नागरिकांना मराठीतून शासकीय परिपत्रके द्यावीत या न्यायालयाच्या आदेशाला मात्र कर्नाटक शासनाने हरताळ फासला आहे? असा सवाल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला. अनेक ठिकाणी रास्ता रोको करून या घटनेचा निषेध करण्यात आला.

कोल्हापुरात पडसाद
ही घटना कोल्हापुरात समजताच शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांसह बसस्थाकाकडे धाव घेतली. या ठिकाणी स्थानकावर उभ्या असलेल्या व रस्त्यावर असलेल्या कर्नाटक परिवहन विभागाच्या सहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली.