आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khade Or Naik? Trouble In BJP Over Sangali's One Ministerial Post

खाडे की नाईक? सांगलीच्या केवळ एका मंत्रिपदावरून भाजपची कोंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - आघाडी सरकारमध्ये एकाच वेळी तीन तीन मंत्री लाभलेल्या सांगली जिल्ह्याच्या वाट्याला महायुतीच्या सरकारमध्ये अद्याप एकही मंत्रिपद मिळालेले नाही. भाजप कोट्यातील सहापैकी एक मंत्रिपद सांगलीला देण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले; मात्र ते कोणाला द्यायचे यावरून भाजप कात्रीत सापडला.

सांगली जिल्ह्याच्या अलीकडील राजकारणावर माजी मंत्री जयंत पाटील यांचा नेहमी प्रभाव राहिला आहे. या वेळच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशामध्ये जयंत पाटील यांच्या नेटवर्कचा मोठा वाटा होता. सांगलीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले चारपैकी दोन आमदार हे निवडणुकीआधी जयंत पाटील यांचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जात होते. खासदार संजय पाटील यांनाही जयंत पाटील यांनी बळ दिले होते. सांगली आणि मिरजेत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपली ताकद लावली होती, हे उघड सत्य आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जयंत पाटील यांच्या शब्दाला भाजपमध्ये किंमत आहे.
म्हणूनच ‘जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपद दिले नाही’ या खासदार राजू शेट्टी यांच्या उपहासात्मक आरोपात तथ्य असण्यास जागा आहे. राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्यामधे ऊस आंदोलनावरून टोकाची कटुता आली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवासाठी जयंत पाटील यांनी दोन वेळा ताकद लावली होती. त्यात त्यांना यश आले नाही. आता राजू शेट्टी भाजपबरोबर गेल्याने राज्यात सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती; पण स्वाभिमानीला मंत्रिपद देणे जयंत पाटील यांना नको आहे.

दुसरीकडे शिराळ्याचे भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे तर जयंत पाटील यांचे पारंपारिक विरोधक. शिवाय लोकसभा निवडणुकीत नाईक यांनी उघडपणे राजू शेट्टी यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद मिळू नये, यासाठी जयंत पाटील प्रयत्नशील आहेत. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपद मिळावे, अशी जयंत पाटील यांची इच्छा आहे; मात्र खाडे यांच्या नावाला भाजपमधूनच विरोध आहे. त्यामुळे मंत्रिपद कोणाला द्यायचे, यावरून भाजप कात्रीत सापडला आहे.

पुढे वाचा भाजपला करायचेय स्वाभिमानीचे महत्त्व कमी