आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकिरणांचा महालक्ष्मीला चरणस्पर्श, ढगाळ वातावरण, इमारतींमुळे किरणाेत्सवात माेठे अडथळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या काेल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये साेमवारी सायंकाळी सूर्यकिरणांनी महालक्ष्मीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. छाया : संजय साळवी
कोल्हापूर - ढगाळ वातावरण आणि इमारतींचे अडथळे यामुळे केवळ काही सेकंदांसाठी करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरामध्ये मावळत्या सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला. किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्यकिरणे केवळ मुख्य गाभा-यापर्यंतच आली होती.
रविवारीही ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणे केवळ गाभा-यापर्यंत पोहोचल्याने भाविकांची निराशा झाली होती. साेमवारी पुन्हा दुस-या दिवशी हा साेहळा अनुभवण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मात्र ढगाळ वातावरणामुळे दुस-या दिवशीही साशंकता व्यक्त होत असतानाच पाच वाजून ३८ मिनिटांनी सूर्यकिरणे देवीच्या गाभा-यापर्यंत आली व पाच वाजून ४६ मिनिटांनी काही सेकंदांसाठी महालक्ष्मीच्या पायावर स्थिरावली. मंदिर परिसरास वाढत्या इमारतींमुळेही किरणोत्सवामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

काय आहे किरणोत्सव?
महालक्ष्मी मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा हा किरणोत्सव होत असतो. ९, १० आणि ११ नोव्हेंबर तसेच जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात हा किरणोत्सव होतो. महालक्ष्मीच्या मंदिराची रचनाच अशी आहे की या तारखांना मावळत्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या चरणांपासून पूर्ण मूर्तीवर पडतात. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.