आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kolhapur Citizens Come On Street For Supporting Honest Officers

कर्तव्यदक्ष अधिका-यांना कोल्हापूरकरांचा पाठिंबा;धुळाज, पवार यांच्या पाठिब्यासाठी जनता रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - अधिकारी त्यांच्या पदाचा वापर समाजासाठी करत असतील, तर समाज त्याच्या बाजूने ठामपणे उभा राहतो याचा वस्तुपाठ सध्या कोल्हापूरकर आणून देत आहेत.अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांची बदली नागपूर आयुक्त कार्यालयात सामान्य करण्यात आली, तर टोलनाके जाळताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस उपअधीक्षक विठ्ठल पवार व पोलिस निरीक्षक यशवंत केडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिन्ही अधिका-यांबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी शहरातील सामान्य नागरिक, संस्था, संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
अप्पासाहेब धुळाज यांनी महसूल विभागातील दलालांची चलती बंद करून टाकली. राजकीय नेत्यांचे जमीन हडपण्याचे डाव उधळून लावले. तलाठ्यापासून ते तहसीलदारांनी गैरमार्गाने मंजुरीसाठी पाठवलेली प्रकरणे रद्द केली. कोल्हापूर शहरातील टीडीआर प्रकरणीही खंबीर भूमिका घेत जागा महापालिकेच्या नावे करून टाकली. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे काही नेते संतापले. महसूल खात्यातीलच काही वरिष्ठ अधिका-यांनाही धुळाज यांची ही पारदर्शी कार्यपद्धती अडचणीची ठरू लागली. यातूनच मग लोकसभा निवडणुकीचे कारण सांगत धुळाज हे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांची थेट नागपूरला बदली करण्यात आली.
नागरिकांचा मोर्चा
अनेक संस्था, संघटनांनी मोर्चे काढून धुळाज यांच्या बदलीचा निषेध केला. धुळाज यांच्या मूळ गावी मुगळी येथे बंद पाळण्यात आला. गडहिंगलज पंचायत समितीच्या सभेतही शासनाचा निषेध झाला. ज्या परिस्थितीत ही बदली झाली, त्याचा विचार करून त्यांचा निरोप समारंभही जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी तो बाहेर घेण्यात आला.
पोलिसांनाही पाठिंबा
12 जानेवारी रोजी शहरात टोलविरोधी हिंसक आंदोलन झाले. त्या वेळी विठ्ठल पवार व यशवंत केडगे यांनी जर आक्रमक भूमिका घेतली असती, तर आगडोंब उसळला असता. अशा परिस्थितीत काही ठिकाणी लाठीमार, तर काही ठिकाणी चर्चा करून हे आंदोलन संयमाने हाताळण्यात आले. आक्रमक आंदोलकांसमोर या दोघांनी घेतलेली भूमिका कोल्हापूरच्या हिताची होती, असे कोल्हापूरकरांचे म्हणणे आहे. दोन्ही अधिका-यांचे निलंबनही मागे घेण्यासाठीही आता लोकांमधून दबाव वाढत आहे.