कोल्हापूर- पोलिसांना दारूच्या पार्टीत गुंतवून पुण्याच्या एका खून प्रकरणातील आरोपीला रुग्णालयातून पळवून नेण्याचा कट पोलिसांनीच उधळून लावला. ही घटना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून यात सामील असलेल्या पोलिसांचीही चौकशी करण्यात येणार आहे.
पुण्यातील मारणे कुख्यात टोळीतील सोमप्रकाश मधुकर पाटील (44, रा. बालेवाडी, पुणे) हा खुनाच्या आरोपाखाली कोल्हापूरातील कळंबा जेलमध्ये होता. काही दिवसांपूर्वी आजारी असल्याचे निमित्त काढून तो कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्याबरोबर बुधवारी रात्री रुग्णालयाच्या कैदी वॉर्डात पोलिसांची पार्टी सुरू असल्याची कुणकुण इतर पोलिसांना लागली. त्यामुळे पथकाने मध्यरात्री कैद्याच्या वॉर्डमध्ये छापा टाकला होता त्यावेळी हे सर्वजण दारू पीत असल्याचे निदर्शनास आले. अचानक छापा टाकल्याने काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने या सर्वांना पकडले.
संजय दिनेशराव कदम (52, रा. राजारामपुरी), अभिजित शरद चव्हाण (26, रा. राजारामपुरी), दिग्विजय शिवाजीराव पोवार (30, रा. न्यू पॅलेस परिसर), जगदीश प्रभाकर बाबर (44, मंडलिक वसाहत) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. मध्यरात्री हा प्रकार घडल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. यातील पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. अनेक कैदी आजाराचे कारण सांगून सीपीआरमध्ये दाखल होत असून त्या ठिकाणी अनेक सुविधा त्यांना दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.