कोल्हापूर - जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कवळीकट्टी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव. गेल्या कित्येक वर्षांपासून गावात एकही मुस्लिम कुटुंब वास्तव्यास नाही. मात्र, गावात मोहरमचा सण गावकरी अतिशय सद्भावनेने आणि उत्साहाने साजरा करतात. पीर बसवताना आणि विसर्जनावेळी अख्खे गाव मिरवणुकीत सहभागी होते. नवस बोलण्यासाठीही दर्ग्यावर महिलांची तोबा गर्दी होते.
हे गाव महाराष्ट्रात असले तरी कन्नड भाषेचा प्रभाव येथे जाणवतो. पीरदेवाच्या जागृत देवस्थानामुळे या परिसरात या गावाचा चांगलाच बोलबाला आहे. गावात इतर सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून एकही मुस्लिम कुटुंब नाही. मुस्लिम कुटुंब नसूनही इथे साजर्या होणार्या मोहरमला मात्र शेकडो वर्षांची परंपरा आहे. मोहरमसाठी तीन किलोमीटरवर असलेल्या तेरणी गावातून अब्दुल कादर हुसेन जमादार गावात येतात. मोहरम झाला की परत जातात.
पीर बसवण्याच्या दिवशी गावातील सरपंच, पाटील, मगदूम, कुलकर्णी, देसाई, पोवार, मोहिते, चौगुले हे मानकरी आवर्जून विधीला उपस्थित असतात. प्रतिष्ठापनेनंतर चार दिवसांनी घरोघरी नवैद्य केला जातो. प्रत्येक घरातील महिला या पीरासाठी संध्याकाळी नैवेद्य घेऊन येते. खाई पेटवली जाते. कत्तलरात्र होते. नंतर नवस बोलण्यासाठी तर पंचक्रोशीतून ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात. या वेळी माहेरवाशिणीही गावात येतात. पेढे, साखर वाटली जाते. नंतर खाई मुजवून ताबुतांचे गावाबाहेर विसर्जन केले जाते. गावातील प्रत्येकाचा या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग असतो. इथे या उत्सवात धर्म, जात अशी बंधने सारेच विसरून जातात. मग उरतो तो फक्त उत्सव, उत्साह आणि तेवढीच मनापासून असलेली श्रद्धा.
गावात मुस्लिम राहत नसले म्हणून काय झाले? आमच्या गावातील हे पीराचे देवस्थान आस्थेचा विषय आहे. म्हणूनच या सणानिमित्त येणारा खर्च ग्रामस्थ आणि भाविकांच्या देणगीतून होतो. त्यासाठी वहीच घालण्यात आली आहे. पुढच्या वर्षीच्या खर्चासाठी देणगीदार
आपली नावे नोंदवतात आणि तो निधी पुढील वर्षी खर्च करतात. कोणतीही कुरकुर करता गेली अनेक वर्षे भाविकांच्या पाठबळावर हा मोहरम सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरला आहे.
ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचे
गेली ३० वर्षे मी मोहरमनिमित्त या गावात येतो आणि सण झाल्यानंतर पुन्हा गावी जातो. मात्र, या आठवडाभराच्या कालावधीत कवळीकट्टी ग्रामस्थांचा या उत्सवातील सहभाग आणि सहकार्य पाहून भारावल्यासारखे होते. हा सण कोणत्या एका जाती-धर्मापुरता ठेवता तो सबंध गावाचा सण असल्याच्या भावनेतून येथे मोहरम साजरा केला जातो. मला येथे सेवा करण्याची संधी मिळते हे माझे भाग्य आहे. - अब्दुलकादर हुसेन जमादार
आमचा दर्गा जागृत देवस्थान
कवळीकट्टीचा दर्गा हे जागृत देवस्थान आणि गावचे भूषण आहे. मुलांचे आपसांत भांडण झाले तरी पीराजवळ शपथ घेतोस का, अशी विचारणा केली जाते. इतकी या दर्ग्यावर ग्रामस्थांची श्रद्धा आहे. गावातून
विवाहानंतर बाहेर गेलेल्या मुली आजही या सणासाठी माहेरी येतात. एस.के. पाटील, शेतकरी